Washim : मालकिणीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत शेतात पडली, म्हशीने चाऱ्यासोबत खाल्ली, म्हशीची सोनोग्राफी आणि ऑपरेशनचा खर्च किती?
वाशिममध्ये एका म्हशीनं चाऱ्यासोबत अडीच तोळ्याची सोन्याची पोत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर म्हशीवर शस्त्रक्रिया करुन सोन्याची पोत पोटातून बाहेर काढण्यात आली आहे.
Washim : आपण अनेक वेळा लहान मुलांनी नाणं गिळल्याचं किंवा धातूची, प्लास्टिकची एखादी वस्तू गिळल्याचं पाहिलं किंवा ऐकलंही असेल. अशा वेळेस त्या बाळाच्या पोटातून गिळलेली वस्तू बाहेर काढणं कठीण असतं. ते काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. काही वेळा वस्तू पोटात अडकल्यानं किंवा घशात अडकल्यानं मृत्यू झाल्याच्या घटनाही आपण पाहिल्या असतील. मात्र, वाशिममध्ये एका म्हशीनं चाऱ्यासोबत अडीच तोळ्याची सोन्याची पोत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. जेव्हा हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला तेव्हा लाखमोलाच्या म्हशीवर शस्त्रक्रिया करुन सोन्याची पोत पोटातून बाहेर काढली आहे.
सध्या शेतकरी शेतीच्या कामात व्यवस्त आहेत. वाशिमच्या सारसी भोयर या गावातील शेतकरी रामकृष्ण भोयर यांच्या कुटुंबाचे सोयाबीनच्या शेंगामधून दाणे बाहेर काढण्याचे काम सुरु होते. यावेळी त्यांच्या बायकोच्या गळ्यातली सोन्याची पोत सोयाबीनच्या काढलेल्या टरफलामध्ये पडली. ते टरफल सकाळी म्हशीला चारले. टरफलाबरोबर म्हशीनं सोन्याची पोथही खाऊन टाकली. मात्र, जेव्हा घरात सोन्याची अडीच तोळ्यांची पोथ सापडत नव्हती, तेव्हा शोधाशोध सुरु झाली. या दरम्यान कळलं की ती सोन्याची पोत शेंगाच्या टरफराबरोबर म्हशीच्या पोटात गेली. हा प्रकार कळताच तात्काळ लगेच शेतकरी रामकृष्ण भोयर यांनी पशुवैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांचा सल्ला घेतला.
म्हशीची केली सोनोग्राफी
पशुवैद्यकीय केंद्रामध्ये तात्काळ या म्हशीला हलवण्यात आले. म्हशीची मेटल डिटेक्टर आणि सोनोग्राफीच्या साह्याने तपासणी केली. लगेच म्हशीच्या पोटात असलेली सोन्याची पोत दिसली. त्यानंतर लगेच म्हशीवर शस्त्रक्रियेची तयारी सुरु करण्यात आली. शस्त्रक्रियाही झाली आणि म्हशीच्या पोटातून अडीच तोळ्याची सोन्याची पोत बाहेर काढण्यात आली. सोबत म्हशीच्या पोटात दोन ते तीन खिळेही निघाले. त्यामुळं म्हशीचा जीव तर वाचलाच सोबत लाखमोलाची सोन्याची पोतही मिळाली. शेतकऱ्यांकरिता आपलं पशुधन महत्त्वाचं असते. कारण त्याच्या सोबतीला ते खांद्याला खांदा लावून काम करतात. दूध असेल किंवा शेतातील कामं जनावरे करतात. त्यामुळं शेतकरी गोधनाला जीवाच्या पलीकडे जाऊन जपतो.
म्हशीवर विनामूल्य शस्त्रक्रिया
शेतकरी रामकृष्ण भोयर यांनी शासकीय पशुवैद्यक डॉक्टरांच सल्ला घेतला. त्यानंतर शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात म्हशीवर संपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळं शेतकरी रामकृष्ण भोयर यांचा मोठा खर्च वाचला. खासगी डॉक्टरकडून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च आला असता. मात्र, शासकीय दवाखान्यात म्हशीवर शस्त्रक्रिया केल्यानं भोयर यांचा खर्च वाचला.
महत्त्वाच्या बातम्या:
Animal Husbandry : लाळ खुरकत रोगामुळं पशुपालकांना मोठा आर्थिक फटका, प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय कराल उपाययोजना?