Washim News: वाशिमच्या (Washim) कारखेडामध्ये तलाठ्याने जिवंत निराधार वृद्ध महिलेवर शासकीय कार्यालयातील तलाठ्याच्या चुकीमुळे 85 वर्षीय आजीबाईंना नाहक त्रास सहन करवा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय कार्यालयातील तलठ्याने जिवंत आजी मृत असल्याचे दाखवत त्यांची पेन्शन बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील सहा महिन्यांपासून ही वृद्ध महिला पेन्शनसाठी तहसील कार्यालाचे उंबरठे झिजवत आहे. तसेच आयुष्यातल्या शेवटच्या काही काळामध्ये काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी या 85 वर्षीय आजीबाई पेन्शनची माफक अपेक्षा करत आहेत.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडामधील येथील रत्नप्रभाबाई देशमुख (85) या आजीबाई गेल्या सहा महिन्यांपासून जिवंत असल्याचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्या चढत आहेत. रत्नप्रभाबाई या निराधार असून त्यांनी श्रावण बाळ योजनेअंतर्गत पेन्शन लागू करण्यात होती. त्याच पेन्शनचे पैसे खात्यात जमा व्हावेत यासाठी या आजीबाई तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. या आजीबाईंना मृत असल्याचा दाखला तलाठ्याने तहसिलदारांकडे दिला. त्यामुळे जानेवारी 2023 पासून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली. त्यामुळे तलाठ्याच्या या चुकीमुळे या आजीबाईंना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्टीकरण
तहसीलदार कार्यालयाकडून अनावधाने हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आता लवकर या आजीबाईंची पेन्शन सुरु करण्यात येणार असल्याचं देखील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकाराचा अहवाल न घेता घर बसल्या हा खोटा दाखला तयार करण्यात आल्याचा दावा ग्रमापंचायत सदस्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नेमकी या प्रकरणात कोणाची चूक आहे याबाबत अद्याप तरी स्पष्टता मिळाली नाही. पण आजीबाईंना मात्र या सर्व प्रकारामुळे या वयात नाहक त्रास सहन करावा लागला ही बाब देखील दुर्लक्षित करता न येण्यासारखी आहे. पण आता तरी या आजीबाईंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतात की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
अनेकदा शासकीय योजनांचा चुकीच्या प्रकारे लाभ घेत असल्याच्या घटना आपण पाहत असतो. तसेच तहसीलदार कार्यालयाच्या कामकाजाचा अनेकदा नागरिकांना त्रास सहन करत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं. यामुळे तलाठी कार्यालयाच्या कामकाजावर अनेकदा प्रश्न देखील उपस्थित केले जातात. त्यामुळे तलाठी कार्यालयांवर काही जरब बसणार की नाही असा सवाल देखील नागरिक आता करत आहेत.