Pune MPSC Girl Dead Body Crime : MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना पवार असं या तरुणीचं नाव असून राहुल हांडोरे, असं तिच्यासोबत ट्रेकिंगला गेलेल्या मित्राचं नाव आहे. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. CCTV फुटेजपाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.


घटनाक्रम काय आहे? CCTV मध्ये धक्कादायर माहिती समोर...


दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे. 


पुण्यात दर्शना मैत्रीणीच्या घरी थांबली होती..


दर्शना पवारने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (MPSC) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (RFO) पोस्ट मिळवली होती. त्यामुळे तिचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार स्वीकारण्यासाठी दर्शना पुण्यात आली होती. त्यामुळे ती नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे थांबली होती. पुण्यात दोन, तीन ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर ती मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगून सिंहगडावर आणि राजगडावर ट्रेंकिगला गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी सगळीकडे चौकशी केली. अखेर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली होती. 


ओळख कशी पटली?


राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दर्शना पवार हिचे वडील दत्तात्रय पवार यांनी 12 जूनलाच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी दत्तात्रय पवार यांना माहिती देत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यांनी राजगडाच्या पायथ्याशी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरुन दर्शनाच असल्याचं सांगितलं. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता आणि काही भाग प्राण्यांनी खाल्लेला देखील होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.


संबंधित बातमी-


MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयस्पद मृत्यू, राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह