Washim News : वाशिममध्ये अंमली पदार्थांचा विळखा, मुंबईतून वाशिममध्ये अंमली पदार्थ आल्याचा पोलिसांना संशय
Washim News : वाशिम जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विळखा पडल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या संदर्भात वाशिम पोलीस अधिक तपास करत आहेत.

Washim News : विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्यात ड्रग्सचा विळखा वाढत असल्याचं चित्र आहे. तर एका 26 वर्षीय तरुणाचा अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. काही दिवसांपूर्वी वाशिमच्या एका नामांकित फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता त्याचे हृदय बंद पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
या तरुणाचा व्हिसेराचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूच्या आधी हा तरुण मित्रांसोबत एका पार्टीमध्ये सहभागी झाला होता. यामध्ये काही तरुणांनी दारु प्यायल्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या चर्चा आता वाशिममध्ये जोर धरत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आतापर्यंत अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रकार घडतात. त्यामुळे अनेक तरुणांचा आतापर्यंत बळी गेल्याचं चित्र मुंबईत आहे. पण आता ग्रामीण भागातही तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत असल्याचं चित्र आहे.
या तरुणाबरोबर काही तरुण मुंबईला गेल्याची माहिती मिळत आहे
अगदी सहज आणि सोप्या समजल्या जाणाऱ्या या व्यसनाकडे वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्यातील तरुणाई आकर्षित होत असल्याचं चित्र आहे. पण याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर मुंबईतून वाशिममध्ये अंमली पदार्थ आणल्याच्या चर्चा सध्या जिल्ह्यात आहेत.
दरम्यान वाशिमच्या या ड्रग्जप्रकरणात मुंबईचं कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण काही दिवसांपूर्वी या मृत तरुणाबरोबर काही तरुण मुंबईला गेल्याची माहिती मिळत आहे. एकदा नव्हे तर तब्बल आठ ते दहा वेळा या तरुणांनी मुंबईवारी केल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईवरुनच वाशिममध्ये ड्रग्ज आल्याच्या चर्चा सध्या आहेत.
मोठं ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता
दरम्यान पोलीस या घटनेच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलसांकडून सांगण्यात येत आहे. पण जोपर्यंत या तरुणाचा व्हिसेरा अहवाल येत नाही तोपर्यंत पोलिसांना पुढची कारवाई करता येणार नाही. पण आता पोलिसांना या अंमली पदार्थांविषयी बरीच माहिती मिळत आहे. तसेच लवकरच या प्रकरणातील मुख्य अंमली पदार्थ विक्रेता आणि मोठं ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून आता पुढील तपास करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
