Washim Accident : वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात साळंबी गावालगत दिग्रस-अकोला महामार्गावर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार एकजण गंभीर जखमी झाला. तर दोन जण किरकोळ जखमी झालेत.यापैकी एका गाडीतून तीन जण लग्नासाठी जात होते. 


मेहकरकडून मानोराकडे लग्न समारंभासाठी निघालेल्या एका चारचाकी वाहनाला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची धडक लागल्याने दोन्ही गाड्यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नासाठी जाणाऱ्या तीनपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या गाडीमधील दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळतेय.


अपघात इतका भीषण होता की एक गाडी थेट रस्त्याच्या कडेला जाऊन खालच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. तर दुसऱ्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव मेहकर येथून ही मंडळी मानोराकडे लग्नाकडे जात असल्याची प्राथमिक माहिती कळते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं. तर जखमींना तात्काळ रुग्णवाहिका पाचारण करून जखमींना उपचारासाठी हवलण्यात आलं. 


बारवी नदीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळील आसनोली गावाजवळुन वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली  आहे. दोघे बुडत असताना तिसरा मित्र त्यांना वाचवायला गेला असता तोही बुडाला. याप्रकरणी कुळगाव -बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हृतिकेश मुरगू (वय 23), सुहास कांबळे (वय 19), युवराज हुली (वय 18) असे या मृत झालेल्या तरुणांची नावे असून तिघेही अंबरनाथ शहारत राहणारे होते. 
  
मृतक हृतिकेश मुरगू , सुहास कांबळे, युवराज हुली हे तिघे मित्र अंबरनाथ शहरातील घाडगे नगर तसेच जावसई परिसरात राहणारे होते. हे तिघेही काही मित्रांसह दुपारच्या सुमारास बदलापूर जवळील आसनोली  गावाजवळुन वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी  हे सर्व जण  पोहाण्यासाठी  नदीच्या पात्रात उतरले. मात्र नदी पात्रातील खोल  पाण्याचा अंदाज न आल्याने सुहास हा पाण्यात बुडू लागताच त्याला वाचवण्यासाठी युवराज गेला. मात्र तोही  बुडू लागल्याने त्या दोघांना वाचवण्यासाठी हृतिकेश गेला असता त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.


ही बातमी वाचा: