वर्धा  : प्रत्येकाला न्याय मिळावा, आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या करीत आजवर आपण अनेक प्रकारचे आंदोलन किंवा मोर्चे बघितले असतील. त्यातील काही तर अगदी हिंसक आंदोलन देखील असतील. मात्र गावाच्या विकासासाठी निधी नसल्याचं पुढे आल्याने चक्क गावकऱ्यांनी आंदोलनातून आपले अवयव विकायला काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हे आंदोलन सुरू आहे वर्धा (Wardha News) नजीकच्या सेवाग्राम या गावात. गावात गेल्या कित्येक दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद आहे. मूळ गावाचा मूलभूत विकास होत नाही आणि सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये गावाचा विकास समाविष्ट झाला नाही. त्यामुळे गावाचा विकास रखडला, असं या गावकऱ्यांचे म्हणणं आहे. पाठपुरावा करून देखील गावाच्या विकासाची कामे रखडली आहे. त्यामुळे येथील काही गावकरी उद्विग्न होत त्यांनी आपले अवयव विकून गावचा विकास करण्याचे आवाहन शासनाला केले आहे. त्यासाठी या गावकऱ्यांनी प्रशासना विरोधात आंदोलन छेडले आहे. सध्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा होतांना दिसते आहे. 


आमची अवयव विका आणि गावाचा विकास करा- गावकरी 


सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम या मूळ गावचा विकास थांबल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. त्यासाठी गेल्या 21 डिसेंबर पासून सेवाग्राम आश्रमच्या पुढे सेवाग्राम येथील नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी गावातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकेडे जाऊन निवेदन देत गावाच्या विकासकामांची मागणी केली. मात्र स्थानिक प्रशासनाने गावाच्या विकासासाठी निधी नाही, असं कारण पुढे केले. वारंवार पाठपुरवा करून देखील तेचते उत्तर मिळत असल्याने नागरिकांचा प्रशासना विरोधातील रोष आणखी वाढत गेला. परिणामी, गावातील मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नसल्याच्या रागातून गावकऱ्यांनी प्रशासना विरोधात आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात गावकऱ्यांनी 'माझ्या शरीराची अवयव विका आणि गावाचा विकास करा!' असे आव्हानात्मक बॅनर आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले आहे. 


विकास आराखड्यामधून गाव वागळल्याने रखडली विकासकामे  


आम्ही अनेकदा गावाच्या विकासकामांसाठी निवेदन दिले, पाठपुरावा केला. आज गावात गेल्या कित्येक दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद आहे. मूळ गावाचा विकास होत नाही. त्यात आता सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये मूळ गावाचा विकास समाविष्ट झाला नसल्याने अनेक समस्या जैसे थे आहे. गावाचा विकास रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार निवेदन दिली गेली.  मात्र प्रशासनाने अजून पर्यंत गावाचा विकास केला नसल्याची ओरड आता गावकऱ्यांकडून केली जात आहे. त्यातूनच आम्ही गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या बेमुदत आंदोलनातून आमच्या शरीराचे अवयव विकून गावाचा विकास करण्याचे आवाहन प्रशासनाला करत असल्याची प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांनी दिली.


हेही वाचा :