वर्धा - कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे रात्रीत फार्म हाऊसवर मोठा दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. वाघोड्यात नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. 55 पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले.
नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊस वर ठेऊन असते. रविवारी मध्यरात्री दरम्यान त्यांचा दरवाजा ठोठावला, त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच पाच ते सहा जण अचानक तेथे आले व त्यांनी त्यांना मारण्यास व धमकविण्यास सुरुवात केली. यावेळी फार्महाऊस वर नारायण पालिवाल वय 80 वर्ष त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल वय 50 व हरिकुमारी पालिवाल वय 70 हे हजर होते. या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला व त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले. सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता. पोटात चाकू भोसकल्याने गोपाल पालिवाल गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी ऐवज लंपास करीत पळ काढला.
गाडीतील हवा सोडली, मोबाईल सुद्धा हिसकावले-
पालिवाल कुटूंब हे चारचाकी वाहनाने आपल्या फार्महाऊस वर आले होते. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये, यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. कुणाला संपर्क करू नये यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले. पण पालिवाल कुटुंबाने मोठे धाडस दाखवून हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस ठाणे गाठले. आपलयासोबत घडलेली हकीकत सांगितली. विशेष म्हणजे ज्या मुलावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला त्याच जखमी मुलाने वाहन चालवत नेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी दाखवली तात्परता
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले चव्हाण हे तातडीने घटनास्थळी उपलब्ध झाले. तोपर्यंत कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गाडे, ए एस आय निलेश मुंढे, मंगेश मिलके, किशोर कापडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिस्थिती वर नियंत्रण मिळविले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.