Wardha Rain Updates : वर्धा (Wardha) जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस (Wardha Rain Updates) बरसला त्यामुळे अनेक नदी नाले पुन्हा तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यामुळे शेकडो नागरिकांच्या स्थलांतरही झालं. हिंगणघाट, आर्वी, देवळी या तालुक्यांना सर्वात मोठा फटका बसलेला बघायला मिळाला आहे. त्यामुळे थोडा पाऊस जरी बरसला तरी अतिवृष्टीची भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. कारण यावर्षी अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना मोठे हाल सहन करावे लागले आहेत. आठवडाभराच्या काहीशा विश्रांतीनंतर 7 आणि 8 ऑगस्टला रात्रभर मुसळधार पाऊस बरसलेला आहे. सकाळी देखील ढगाळ वातावरण आहे. बोर प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीला सामोरे जाऊ लागू नये, अशीच प्रार्थना नागरिक वरुणराजाकडे करत आहेत.


पावसामुळे अनेक रस्ते पुन्हा बंद 


रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील बोरखेडी कला येथील नाल्याला पूर आला असून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येणारा जाणाऱ्या नागरिकांना वहिवाट ठप्प करावी लागली आहे आणि त्याची कामे देखील खोळंबली आहेत. सेलू तालुक्यातील मध्यरात्री 2 च्या सुमारास काही घरांमध्ये पाणी शिरलं असता सदर व्यक्तींना दुसरीकडे राहण्याची व्यवस्था  केली आहे.


वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ


मुसळधार पावसामुळं वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कौंडण्यपूर येथे वर्धा नदीवरुन पाणी असल्यानं आर्वी देऊरवाडा रस्ता बंद झाला आहे. अगदी सकाळपासूनच छोटे व्यवसायिक शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांची या मार्गावरून येजा असते. मात्र रस्ता बंद असल्यामुळे सर्वांची काम खोळंबलेली आहेत. कोणीही जीवघेणा प्रवास करत हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असंच आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. कारंजा तालुक्यात कालपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळं सावरडोह नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.


पोथरा, यशोदा नदीला पुन्हा पूर; रस्ते बंद 


यंदाच्या अतिवृष्टीमुळे हिंगणघाट तालुक्याला मोठा फटका बघायला मिळाला. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. पुन्हा अतिवृष्टीची धास्ती नागरिकांच्या मनात आहे. आता पुन्हा मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. हिंगणघाट तालुकातील पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी हेटी रस्ता बंद झाला आहे. तसेच यशोदा नदीलाही पुर आल्यामुळे भगवा ते चानकी मार्ग बंद झाला आहे. पाणी पातळीत वाढ होत आहे. यशोदा नदीला पूर आल्यामुळं आलमडोह ते अल्लीपूर रस्ता पुन्हा बंद झाला आहे. रस्त्यावरून नदी नाल्यांचे पाणी वाहत असल्यामुळे आणखी काही रस्ते बंद होण्याची शक्यता आहे.