वर्धा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभरात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली जाणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने भारतीय ध्वज विक्रीस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय ध्वज हा खादी कापडापासून बनलेला असतो. मात्र 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी हे ध्वज पॉलिस्टर या कापडापासून बनविलेले असणार आहेत. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना ते खरेदी करता येतील. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खादी व्यवसायावर मोठा परिणाम झाला. विशेषतः वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगाराची संधी हिरावल्या गेली,असं म्हणायला हरकत नाही. कारण जर पॉलिस्टर ऐवजी खादीचे ध्वज सक्तीचे झाले असते तर पुन्हा ग्रामीण रोजगाराला चालना मिळाली असती आणि खादीच्या विशिष्ट धाग्यांपासून कापड विणण्यासाठी हजारो ग्रामीण हात मोठ्या उमेदीने सक्रिय झाले असते.
वर्धा जिल्ह्यात तयार केला जाणारा खादीचा कापड अतिशय मोलाचा आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा लाभला आहे, आताही खादी पासून तयार केले गेलेल्या ध्वजांची मागणी इतर जिल्ह्यातून देखील आहे. त्यासाठी ग्रामसेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि खादी व्यवसायिक रात्रंदिवस एक करून मेहनत घेत आहेत. मात्र कमी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होणे अशक्य आहे असेच चित्र समोर दिसत आहे.
सेवाग्राम आणि खादी मुळेच वर्ध्याची सातासमुद्रपार ओळख
वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खादी उद्योगाला चालना दिली त्यासाठी अनेक ग्रामीण भागातील बेरोजगार हातांना काम मिळाले होते. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खादीचे कापड तयार केले स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेलं सेवाग्राम आश्रम आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा लाभलेली खादी, यांच्यामुळेच वर्धा जिल्ह्याला सातासमुद्र पार ओळख आहे. खादीपासून बनलेले मास्क देखील कोरोनाकाळात विदेशात पोहोचले होते.
वर्धा खादी ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्षा करुणा फुटाणे म्हणाल्या, वर्धा जिल्ह्यात अनेक खादी संस्था आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या चार ते पाच हजार लोकांचे रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. जर हे झेंडा बनवण्याचं काम सहा महिने आधी दिलं गेलं असतं तर निर्मिती झाली असती. स्थानीय कापसाला देखील चांगला भाव असता, शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं असतं. मात्र आज जो प्रश्न होणार आहे की, एवढा मोठ्या प्रमाणावर झेंडे बनवले जात असताना 15 ऑगस्ट नंतर या झेंड्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. झेंडे जर खादीचे असते तर ही समस्या आली नसती,कारण खादीच्या ध्वजामध्ये एक वैशिष्ट्य आहे. खादीसाठी लागणारे सर्व कच्चामाल हा स्थानिक असतो.
खादी व्यावसायिकांकडे 'उद्दिष्ट मोठं वेळ कमी'
खादीचे कापड हाताने बनवले जाते त्यासाठी मोठा कालावधी लागतो. वर्धा येथील खादी व्यावसायिकांना इतरही जिल्ह्यातून तिरंग्याची मागणी केली गेली आहे. त्यासाठी खादी व्यवसायिक रात्रंदिवस एक करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र 'उद्दिष्ट मोठा आणि वेळ कमी', अशी परिस्थिती उद्भवली आहे. कमी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे अशक्य आहे, अशा प्रतिक्रिया खादी व्यवसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. जर हेच उद्दिष्ट काही महिन्यांआधी दिलं गेलं असतं तर यातून लाखो लोकांना रोजगारही मिळाला असता. खादी व्यवसायाला, एकूणच ग्राम उद्योगाला चालना मिळाली असती, आणि झेंड्याचे महत्त्व टिकवून ठेवता आलं असतं अशी प्रतिक्रिया सेवाग्रामच्या मस्लीन खादीचे संचालक बळवंत ढगे यांनी दिली.