वर्धा : ग्रामीण भागात पावसाळ्यात घरात साप आढळणे साहजिक बाब आहे. मात्र, घरातील सर्व साखर झोपेत असताना कोब्रा (Cobra) थेट अंथरूणात शिरल्याच्या बातमीने फक्त घरातल्यांचीच नाहीतर संपूर्ण गावची झोप उडाली आहे. रेस्क्यू ऑपरेशननंतर कोब्राची जंगलात रवानगी करण्यात आली.
घरातील सर्वच जण साखर झोपेत असताना टिनपत्राच्या कडेला असलेला क्रोबा थेट अंथरुणावर पडला. शरीराला स्पर्श होताच नागाला बाजूला फेकले. परंतु दैव बलवत्तर म्हणून नागाचा कुणाला दंश झाला नाही. मात्र अंगावर पडलेली वस्तू कोब्रा आहे हे कळताच घरात एकच खळबळ उडाली. हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आर्वीच्या तायडे कुटुंबीयांनी हा जीवघेणा थरार रात्री अनुभवला आहे.
वर्ध्यातील (Wardha News) लहान आर्वी येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील रमेश लक्ष्मण तायडे हे कुटुंबीयांसह राहतात. मध्यरात्री अंदाजे 1 वाजताच्या सुमारास साखर झोपेत असताना त्यांचे सासरे काशीराम गायकी हे भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी आले. दरवाजा उघडून ते खोलीत गेले. यावेळी टीनपत्राच्या काठाने घरात घुसलेला कोब्रा साखर झोपेत असलेल्या रेखा रमेश तायडे यांच्या अंथरुणावर पडला. त्यांना अचानक थंडगार काहीतरी स्पर्श झाला आणि त्यांनी हात झटकले. खाली त्यांचे पती रमेश लक्ष्मण तायडे झोपले असल्याने तो साप त्यांच्या अंगावर पडला. खाली बघतो तर काय तो कोब्रा असल्याचं समजलं आणि एकच खळबळ उडाली.
अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग तायडे कुटुंबीयांनी अनुभवला आहे. मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्या हिमतीने नागाला बाजूला फेकले. त्यानंतर नाग दुसर्या खोलीत गेला.कुटुंबीयांनी सर्पमित्रांना मध्यरात्रीच माहिती दिली आणि लगेच सर्पमित्रांनी घर गाठलं आणि सापाला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. त्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.
संबंधित बातम्या :
Kolhapur News : रात्री झोपेत असतानाच मायलेकीला विषारी नागाचा दंश, चिमुरड्या मुलीचा मृत्यू
Kolhapur : अंथरुणात मण्यार सापाने घेतला चावा, तीन दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष सुरु असलेल्या ओंकारची प्राणज्योत मालवली