Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भामटे गावामध्ये मंगळवारी मध्यरात्री एकाचवेळी मायलेकींना विषारी नागाने दंश केल्याची घटना घडली. या घटनेत पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी सचिन यादव (वय 11) नाव असून ती पाचवीच्या वर्गात शिकत होती.
मृत ज्ञानेश्वरीची आई निलम यांनाही नागाने दंश केल्याने सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. भामटे गावात देसाई गल्लीत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी असलेले सचिन यादव पत्नी नीलम, मुलगी ज्ञानेश्वरी व मुलगा रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपी गेले होते.
मध्यरात्री दीडच्या सुमारास सचिन यांच्या पत्नी निलम यांना हाताला चावल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी तातडीने उठून लाईट लावली. त्याचवेळी अंथरुणात नाग फणा काढून उभा होता. त्यामुळे अत्यंत घाबरलेल्या निलम यांनी पती सचिन यांना झोपेतून जागे केले. मात्र नागाने मुलगी ज्ञानेश्वरीला पाठीवर व हातावर दंश त्यापूर्वीच केला होता. मात्र, झोपेत असलेल्या ज्ञानेश्वरीला दंश केल्याचे जाणवलेच नाही.
त्यानंतर तातडीने दोघींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, काल उपचार सुरु असताना चिमुकल्या ज्ञानेश्वरीचा दुर्दैवी अंत झाला. विषारी नागाला पानारवाडी गावातील सर्पमित्रांनी पकडले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या