Wardha News : वर्ध्यात (Wardha) झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) शेकडो हेक्टरवरील पिकं खरडून गेली आहेत. तर शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे. बांधावर पोहचून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांशी (Farmer) देखील संवाद साधला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नदी काठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून देखील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले.
अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका
वर्धा, यशोदा, वणा, बोर आणि धाम या नद्या मुसळधार पावसामुळे दुधडी भरुन वाहत आहेत. तर यशोदा आणि वर्धा नदी काठावरील शेती पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. जवळपास पाचशे बारा गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणाघाटाला बसला आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली, कुंभी, अलमडोह, पिंपळगाव, वाळदुर, मणसावळी, सेलू तालुक्यातील कोटंबा, कोलगाव, येळाकेळी, सरुळ या गावांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
मागील चार दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास 1659 हेक्टर इतक्या क्षेत्रात नुकसान झाले आहे. पण मागील 48 तासांत झालेल्या पावासामुळे यामध्ये आणखी भर पडल्याचं चित्र आहे. सध्या जिल्ह्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वधिक फटका हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी तालुक्याला बसला आहे.
आधीच राज्यात मान्सूनने उशीरा हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. त्यातच आता झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी संकट कोसळले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी देखील करत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती देखील खरडून गेली आहे. देवळी तालुक्यातील काही भागात खासदार रामदास तडस यांनी पाहणी केली. तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खासदार तडस यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका