Wardha News: कोरोना काळात नोकरी गमावलेल्या राजू बावणे या तरुणाने गावाशेजारी आपला स्वतःचा हॉटेल व्यवसाय (Wardha Hotel Business) थाटून पंधरा जणांना रोजगार दिलाय. मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणारा तरुण कोरोना काळात बेरोजगार झाला. हातची नोकरी गेल्याने काय करावे या विवंचनेत असलेल्या राजू बावणे या तरुणाने वर्ध्याच्या खडकी येथे हॉटेल टाकून फक्त रोजगारच शोधला नाही तर तब्बल पंधरा जणांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला. आपल्या कुकिंग कौशल्याच्या आधारावर ग्रामीण भागात हा तरुण मुंबईच्या बटाटा वड्याची चव ग्राहकांना देतो. तर येथे थांबलेल्या प्रवाशांचे समाधान देखील येथील चविष्ट वडापाव करतो आहे.


मूळचे सिंदी रेल्वे येथील राजू श्यामराव बावणे याने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी देखील केली. कोरोनात  नोकरी गेली आणि त्यांचा गावाकडचा परतीचा मार्ग सुरू झाला. आता हाताला काम नसताना गावात जावून नेमके करायचे काय? असा प्रश्न मनाला भेडसावत होता. 


काही दिवस हा तरुण बेरोजगारच राहिला. त्यानंतर वर्धा-नागपूर मार्गावरच्या खडकी येथे छोटे हॉटेल सुरू केले. हॉटेलचे स्किल अंगी असल्याने हाताला चव असणारच, त्यातच मुंबईचा वडापाव वर्ध्यात उपलब्ध करता येईल या संकल्पनेने राजू बावणे आणि पत्नी शुभांगी राजू बावणे या दाम्पत्याने शुभशांती बटाटा वडा या चवदार पदार्थाला ग्राहकांच्या पसंतीस उतरवले. राजू बावणे यांच्या खाऊ गल्लीतील हा लज्जतदार शुभशांती बटाटा वडा अल्पवधीतच अनेकांना तृप्त करून गेला. आजही येथे ग्राहक आवर्जून थांबतो आहे आणि बटाटा वड्याची चवही चाखतो आहे.


एकेकाळी बेरोजगार झालेल्या राजू बावणे या तरुणाच्या रस्त्यावरील हॉटेलात आजघडीला पंधरा कामगार काम करतात. ग्रामीण भागातील हे कामगार देखील आपल्या कामात समाधानी झाले आहेत. ज्यांच्याकडे स्किल नव्हते त्यांना आपल्याकडेच  स्वतः प्रशिक्षण देऊन स्किल देण्याचा प्रयत्न देखील बावणे यांच्याकडून करण्यात आला. कामगारांमध्ये पाच महिला देखील कार्यरत आहेत. यवतमाळ येथून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवशांच्या सोबतीला देखील हा बटाटा वडा पार्सलच्या रूपात रंगत वाढवून जातोय. तर येथील इतर चविष्ट पदार्थाना देखील तेवढीच मागणी आहे.


ही बातमी वाचा: