Hingoli Rain Update : मागील काही दिवसांपासून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पावसाच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी देखील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 28 जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासांत 41.70 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51.74 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी...
हिंगोली 18.60 (444.60) मि.मी., कळमनुरी 60.70(459.70) मि.मी., वसमत 94.20 (442.60) मि.मी., औंढा नागनाथ 9.40 (395.20) मि.मी, सेनगांव 10 (301.20) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
वसमत शहरातील तलाव फुटला...
हिंगीलो जिल्ह्यातील वसमत शहरातील गुरुद्वारा परिसरात असलेला प्राचीन गाव तलाव फुटला आहे. गुरुवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे हा तलाव फुटला असल्याचे समोर आले आहे. अचानक तलाव फुटल्याने परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळाले. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गोंधळ उडाला होता. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली. प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली असून, पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
मोठ्याप्रमाणात नुकसान...
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, यंदा जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, अनेक भागांत पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर जमीन पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे. नद्या नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतात आणि घरात घुसल्याने देखील नुकसान झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी...
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन, सावकाराकडून, तसेच हातउसणे पैसे घेऊन पेरण्या केल्या आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकरी परत एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
इतर महत्वाचे बातम्या: