Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे साखरझोपेत असताना बहीण-भावाला रात्री एका विषारी सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. यात बहीण-भावाची प्रकृती अतिशय चिंताजनक असून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णलयाच्या अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरु आहेत. 'मण्यार' या विषारी सापाने दंश केल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून अतिदक्षता विभागात बहीण भावाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या बहीण भावामधील मुलाचं वय 15 वर्ष तर मुलीचं वय 18 वर्ष आहे.
सर्पदंशाने बहीण-भाऊ व्हेंटिलेटरवर :
सापाच्या दंशाने दोघांनाही अर्धांगवायूचा त्रास झाला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून दोघेही बहीण भाऊ सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. गिरड येथील पेठ परिसरातील राजू नेहारे यांच्या योगेश (15) आणि योगिता (18) या मुलांना रविवारी रात्री घरी जमिनीवर गाढ झोपेत असताना सापाने दोघांना दंश केला. सोमवारी सकाळच्या सुमारास या दोघांना अचानक वेगळा अशक्तपणा, चक्कर येणे आणि डोळ्यांना काहीही दिसत नसल्याची बाब त्यांनी आपल्या पालकांना सांगितली. गावातील श्रीराम मंदिर देवस्थान कमेटीचे अध्यक्ष आणि पालकांनी लागलीच दोघांना गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता येथे प्राथमिक उपचार करुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
सध्या बहीण-भावावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीप्रकाश कलंत्री यांनी दिली. मण्यार जातीच्या सापाने दंश केल्यावर वेदना होत नाही. मात्र, काही तासानंतर पापण्या जड होणे, अर्धांगवायू मारणे, गिळण्यास त्रास होणे, सूज येणे यांसारखी लक्षणं आढळून येतात. सर्वसामान्य सापापेक्षा हा साप विषारी आहे. त्यामुळे तत्काळ निदान होऊन योग्य उपचार हाेणे महत्वाचे असते असे मत सर्प अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत बहीण भावाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- CM Relief Fund : नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 48 लाखांचा निधी, 'हे' आहेत लाभार्थीचे निकष
- Beed Rain News : बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, उडीद , मूग, कांदा पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी