Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यात सात गोवंशिय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग (Lumpy Virus) सदृष्य रोगाची लक्षणं आढळून आली आहे. जिल्ह्यात या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्षणं आढळलेल्या गावांसह परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. लम्पी रोगाचा संसर्ग (Lumpy Skin Disease) झालेल्या जनावरांमध्ये आर्वी आणि आष्टी तालुक्यातील जनावरांचा समावेश असून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. मृत बैलाचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले असून रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं आर्वीचे पशुसंवर्धन तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय सहायक आयुक्त डॉ. आर एस अढाऊ यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
कोणती गावं बाधित?
आर्वी शहर आणि या तालुक्यातील हिवरा (तांडा), सावळपूर आष्टी तालुक्यातील वडाळा या गावांमध्ये लम्पी सदुष्य लक्षणं असलेली जनावरं आढळून आली आहेत. त्यामुळे ही गावं बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
हिवरा (तांडा) या गावालगतच्या 5 किलोमीटर परिसरात असलेली आर्वी तालुक्यातील हर्रासी, पाचोड, बेल्हारा (तांडा), हिवरा, जामखुटा, राजणी ही गावे सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भिती
आर्वी शहराच्या ठिकाणापासुन 5 किलोमीटर परिसरातील खडकी, शिरपूर, पिंपळा, वाढोणा, मांडला, धनोली (नांदपूर), सावळापूरच्या परिसरातील अंतरडोह, जाम, जाम, लहादेवी, पांजरा, हरदोली, बाजारवाडा तसेच आष्टी तालुक्यातील वडाळा या गावाच्या परिसरातील बोरगाव, टूमणी, झाडगाव, वर्धपूर, सत्तरपूर ही गावे देखील सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. या गावांमधील बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गिय जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाली आहे.
बाधित जनावरांचं विलगीकरण
आर्वी आणि आष्टी तालुक्यातील संबंधित गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आलं आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या जनावरांना चारा आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत संबंधित नगर पंचायत आणि ग्रामपंचायतींना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्यांचे शव, कातडी यांस इतरत्र प्रवेश आणि वाहतुकीस मनाई करण्यात आली आह. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
जनावरांमधील लम्पी या चर्मरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांचं उल्लंघन करणाऱ्या आणि त्याप्रमाणे सुसंगत कृती न करणाऱ्या, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था यांच्या विरुद्ध प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. याबाबतच्या कायदेशिर कारवाईसाठी ग्राम पंचायत आणि नगर परिषदांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.