(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : 'सरकार टेंडर अन् टक्केवारीत व्यस्त, शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम', विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar : हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे. आचासंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे. आचासंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी घेऊन 25 हजार कोटींचे टेंडर काढले आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आणि मराठवाड्यात (Marathwada) तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यात गेल्या वर्षात जास्त वेळा अवकाळी आणि गारा पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पंचनामे होतात मात्र मदत मिळत नाही. पिण्याच्या पाण्यापासून तर शेतकऱ्यांना (Farmers) उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील 1561 गावांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. मराठवाड्यात 1600 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यातच सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत.
शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम
हे सरकार टेंडर आणि टक्केवारी मध्ये व्यस्त आहे. आचासंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25 हजार कोटींचे टेंडर काढले आहे. शेतकऱ्यांना आचारसंहिता सांगतात मात्र इकडे टेंडर काढतात. शेतकऱ्यांच्या मदतीला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली असती मात्र यांना परवानगी द्यायची नाही, असे त्यांनी म्हटले.
जलयुक्त शिवार योजना फसवी
ज्या पंतप्रधानांनी सांगितले तुमच्या मालाला चांगला भाव देऊ, त्यांना भाव हा केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मिळाला नाही.आम्ही दुष्काळाची परिस्थिती पाहता अहवाल घेऊन सरकारला देणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत. मोफत बियाणे द्यावेत. विद्युत बिले माफ करावेत. कर्ज वसुली थांबवावी. चारा आणि पाणी ही उपलब्ध करा. टँकरचे जीपीएस मोटरसायकलला लावून फिरवतात आणि घोटाळा करतात. जलयुक्त शिवार योजना आणली. तिचा गाजावाजा केला मात्र संपूर्ण राज्य पाण्यासाठी फिरतंय. ही योजना विफल आणि फसवी असल्याचे समजते, अशी टीका त्यांनी येवेली केली आहे.
वडेट्टीवारांची कृषीमंत्र्यांवर टीका
या सरकारने शेतकऱ्यांना सोडले नाही. सोन्याला आणि हिऱ्याला दोन टक्के तर ट्रॅक्टरला 14 टक्के जीएसटी लावला जातो. 35 ते 28 टक्के बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. लिंकिंगमुळे शेतकरी सावरत नाही. मात्र कृषिमंत्री थंड हवेच्या ठिकाणी गेले. माझी निवडणूक झाली तुम्ही मरा हा नंतरचा विषय. तुम्ही त्याला 45 अंश सेल्सिअस तापमानात उभे करून थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. जिल्ह्यात मोठ संकट असताना हे बाहेर कसे जाऊ शकतात. तुमच्या विभागच्या बैठकीला मंत्री उपस्थित नसतात मग काय झक मारायला मंत्री बनले? अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर केली आहे.
जितेंद्र आव्हाड पुरोगामी विचारांचे सच्चे कार्यकर्ते
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचारांचे सच्चे कार्यकर्ते आहेत. मनुस्मृती जाळण्याच्या ओघात ते झाले. ते जाणूनबुजून केलेले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा
मोठी बातमी! मान्सून आला, केरळ आणि उत्तर-पूर्व भारतात एकत्रच वर्दी; हवामान विभागाची माहिती