Vidarbha Weather Update नागपूर : सध्या राज्यासह देशातील बहुतांश भागात उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून गरज नसल्यास दुपारी घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर अलिकडे उष्माघाताच्या संख्येतही विलक्षण वाढ झाली आहे. असे असताना विदर्भात पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असून काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट देखील राहणार आहे. तर पुढील पुढील 24 तासात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील विलग झालेल्या भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता नागपूर प्रदेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.   


विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, तर काही भागात अवकाळी ढग


आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर उद्या 1 जून ते 4 जून पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज नागपुर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्या 1 जून रोजी विदर्भातील  वर्धा, नागपूर, चंद्रपूर येथे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे तर 2 जून रोजी वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज  व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढे 3 जून रोजी हीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात कायम असणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.  


चंद्रपूरचा पारा 45.6 अंश सेल्सिअसवर


नागपुर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, आज विदर्भातील सर्वाधिक तापमान हे चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर  भंडारा येथे 45.3, तर गडचिरोली आणि वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस तापमानची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपूर शहरात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या संशयित मृत्यूच्या तपासणीला घेऊन आज नागपूरात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उष्माघाताच्या मृत्यू संदर्भात अहवाल देण्यात येणार आहे. सध्या नागपूर महानगर पालिकेने 3 संशयित मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नोंदवली आहे. 


सध्या फक्त विदर्भातच नाही राज्यात अन् देशात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यात आज 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या दिवसा सूर्यदेवाचा कोप इतका असतो की, लोकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यामुळे ही जमावबंदी पुढेही कायम राहते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात


फक्त दुपारीच नाही तर सकाळपासूनच  उन्हाचा पारा एवढा वाढलेला असतो की, लोकांना घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागत आहे. परिणामी अनेक शहरात दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात बघायला मिळत आहे. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही उष्ण वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल केल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या