Vidarbha Unseasonal Rain : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी काल दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान (Crop Loss) केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.


यात अकोल्यात (Akola News) काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिट आणि वादळी वाऱ्यामुळे धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वाशिम शहरात दुपारच्या सुमारास बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला धान्य भिजल्याच चित्र बघायला मिळालंय. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. 


केळीची पिकांना अक्षरश: झोडपलं 


अकोल्यात काल सोमवारच्या रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपिट झालीये. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या काही गावांना या गारिपिटीसह पावसाचा फटका बसलाय. धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल झालेल्या अवकाळीमूळे अस्मानी संकटाला समोर गेलाय. अनेक शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय. अकोट तालुक्यातल्या धामणगाव शेतशिवारात गारपिटीमूळ तोडणीवर आलेल्या केळी पिकाला जबर मार बसला.


तर पावसासह वादळी वाऱ्यामूळे केळीची झाड़ं अक्षरश: जमिनीवर कोसळले आहे. तर काही भागात केळी पिक भुईसपाट झाले आहे. या भागात गेल्या काही दिवसांत अवकाळीचा तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाका बसला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


पावसाचा बाजार समितीत विक्रीला आणलेल्या धान्याला फटका   


वाशिम शहरात सोमवारच्या दुपारी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजल्याच चित्र बघायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झालंय. हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार दुपारच्या वेळी पाऊस झाला. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल ओट्याच्या खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे हा माल भिजला. यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. या पूर्वी सुद्धा अनेकदा असेच प्रकार घडलेले असून कृषी उत्पन्न बाजार समिती यावर लक्ष देत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


झाडे उन्मळून पडली, विद्युत पुरवठा खंडित


वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम, तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस बरसला. रिसोड तालुक्यात काल संध्याकाळी पाचवाजेच्या सुमारास वाकद परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल असून रिसोड मेहकर मार्गावर वाकद गावाजवळ भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने जवळपास तासभर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. तर अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या