छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळाचे भयाण वास्तव मे महिन्याच्या शेवटी पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी माणसं वण वण भटकत आहेत, तर चाऱ्यासाठी जनावरांनाही छावण्यांत राहावं लागत आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती होत आहे, प्रशासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या टँकरवर पुन्हा एकदा नळावरील भांडणासारखीच परिस्थिती दिसून येते. मराठवाड्यातही भीषण पाणीटंचाई (Water) जाणवत असून सगळीकडे भकास माळरान पाहायला मिळत आहे. आधीच पाऊसकाळ कमी झाला होता, त्यातच यंदाच्या कडक उन्हामुळे विहिरी, बोर आणि शेततळ्यांमधील पाणी आटलं आहे. जिल्ह्यातील मुरुमखेडा गावातील शेततळ्यांची सद्यस्थिती हाय रे दुष्काळ म्हणायला लावणारीच आहे. येथे सन 2018 ला शेततळ्याने समृद्धता, सुबकता आणि धरतीला हिरवा शालू नेसवला होता. त्यामुळे, शेतकरीही (Farmer) सुखावला होता. पण, आज हे दृश्य चारही बाजूंनी डोंगराने वेढा घातलेल्या मुरूमखेडा गावातील 757 हेक्टर शेतीचं वाळवंट झाल्याचं चित्र आहे.
2018 साली मुरुमखेडा गावातील 110 शेततळ्यात शेतकऱ्यांनी तब्बल 10 कोटी लिटर पाणी साठवले होते. मात्र, आता 10 लिटर पाणी देखील येथील शेततळ्यात नाही. शेततळी कोरडी पडली आहेत, एवढेच नाही तर शेवाळही भेगाळल्याचं दिसून येत आहे. अजय-अतुल यांच्या गाण्यातील ओळीप्रमाणे भेगाळल्या भुईगत जीणं येथील शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं पाण्याविना झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या गावच्या शिवारात चोहोबाजूंच्या डोंगरांमुळे भरपूर पाऊस पडायचा आणि ओढे-नाल्यांनी पाणी वाहून जायचं. त्यामुळे पावसाळा सोडला तर गावात पाण्याअभावी कायम दुष्काळच. गावकडे शेतकरीही शेतीत फक्त खरिपाचा एकच हंगाम घ्यायचे. मात्र, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येवर विचार विनिमय करुन तोडगा काढला. सन 2018 मध्ये गावच्या शिवारात तब्बल 111 शेततळी घेण्यात आली आहेत. आता, या शेततळ्यांची संख्या 150 पर्यंत गेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आणि अपेक्षेनं शेततळी केली. मात्र, यंदाच्या कडक उन्हाळ्यात आणि पाऊस काळ कमी झाल्याने ही सर्वच शेततळी आटून गेली आहेत.
डाळिंबाच्या बागाही वाळल्या
दोन वर्षापूर्वी मुरूमखेडा गाव आजूबाजूच्या गावांना मजूर पुरवणारं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. पण गावात शेततळ्याची क्रांती झाली आणि गावात आजूबाजूचे लोक मजूर म्हणून येत असल्याचा बदल घडून आला. येथील ग्रामस्थांनी या शेततळ्यांखाली 25 हेक्टर डाळिंबाची लाली कधीच कमी होऊ दिली नाही. पण, यंदा डाळिंबाच्या बागा वाळून गेल्यात, आता गावातील लोकांना मजुरीसाठी बाहेर जाण्याची वेळ आलीय. धनसमृद्ध शेतकरी पुन्हा मजुरीकडे वळल्याचं भीषण चित्र आहे.
भोग सरेल, सुख येईल
मराठवाड्यात वारंवार दुष्काळ पडतो. शेतकरी दुष्काळाशी सामना करतो. मोठ्या कष्टानं पाण्याची बँक तयार करतो पण लहरी निसर्ग त्याचं क्रेडिट होऊ देत नाही. मात्र, शेतकरी हातबल होतो, पण हारत नाही, याच आशेनं दिस येतील दिस जातील भोग सरेलं, सुख येईल, असे म्हणत येथील शेतकरी आता पावसाची वाट पाहात आहे. पुन्हा आपल्या शेततळ्यात पाणी येईल आणि डाळिंबाची लाली पुन्हा दिसेल हाच विश्वास बळीराजामध्ये आहे.