'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'.. छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथ घेतो की..
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2019 06:47 PM (IST)
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून एक महिना चार दिवस झाल्यानंतर अखेर महाराष्ट्राला पर्मनंट मुख्यमंत्री मिळाला आहे. राज्याचे 29 वे तर शिवसेनेकडून तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथेला सुरुवात केली. बरोबर 6.40 वाजता उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वंदन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुकचे अध्यक्ष एम. के स्टॅलिन, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, राजू शेट्टी, छगन भुजबळ, अजित पवार, आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. हे ही वाचा - 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी उपस्थित होते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले होते. राज्यातील शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करुन आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करु इच्छितो, असे राऊत यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांसह हजारो शिवसैनिक, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून शपथ घेण्याआधी या आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संयुक्त कार्यक्रम जाहीर केला आहे. या किमान सामान कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे घटक केंद्रस्थानी असलेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीने आखल्या कार्यक्रमाची परिणामकारक अमलबजावणी करण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती केंद्र आणि राज्यातील संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांना पीकविमा आणि महाविकासआघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये 10 रुपये थाळीचा समावेश करण्यात आला आहे. आता राज्यभरात सर्वसामान्यांसाठी स्वस्त व सकस जेवणाची थाळी 10 रुपयात देण्याची व्यवस्था अखेर अधिकृतरित्या सरकारच्या अजेंड्यावर आली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातील 10 रुपयात थाळीबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला होता. या किमान समान कार्यक्रमाच्या निवेदनावर उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या सह्या आहेत.