मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राचं संपादकपद सोडलं आहे. 'सामना'ची संपूर्ण जबाबदारी आता खासदार संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संजय राऊतच आता सामनाचे कार्यकारी संपादक असतील. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे 'सामना'च्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.

'सामना' हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर 'सामना'च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात. 'सामना'त छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी 'बातमी'चा विषय असतो. शिवसेना सत्तेत असो किंवा बाहेर, या पक्षाची भूमिका नक्की काय आहे हे पाहण्यासाठी 'सामना'कडे कायम लक्ष असतं.


संजय राऊत कोणावर टीकेचे बाण सोडणार?
खरंतर पक्षप्रमुखच 'सामना'च्या संपादकपदी असल्याचं पाहायला मिळत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनाची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने त्यांना वृत्तपत्राचं संपादकपद सोडावं लागलं. त्यामुळे दैनिकाची सर्वस्वी जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत 'सामना'चे कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे ते कोणावर आणि कोणत्या मुद्द्यावर टीकेचे बाण सोडतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

'सामना'ची स्थापना बाळासाहेबांनी केली नाही?
शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. पण 'सामना'ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, हे वाचून आश्चर्य वाटेल. 1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची. 1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला. बाळासाहेबांनी 'सामना' हे नावही सुचवलं. परंतु नोंदणीच्या वेळी हे नाव सोलापुरातील बार्शीमध्ये राहणारे पत्रकार आणि संपादक वसंत कानडे यांच्या नावावर होतं. सुभाष देसाई बार्शीत गेले असताना त्यांची वसंत कानडे यांच्यासोबत भेट झाली. आपल्या बातम्या आणि लेख यावेत या माफक अटीवर वसंत कानडे यांनी 'सामना' नावाला परवानगी दिली. शिवसेनेचा 'सामना' दैनिक स्वरुपात असला तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली वसंत कानडे यांचं निधन झालं.