नवी मुंबई : एकीकडे उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना दुसरीकडे अमित ठाकरे देखील राजकरणात पहिल्यांदाच सक्रिय झाले आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव गेल्या काही दिवसात राजकारणात सक्रिय असले तरी अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्षाचे नेतृत्व केले नव्हते . मात्र गुरूवारी (28 नोव्हेंबर) अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत कामगार मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे एकीकडे ठाकरे घरण्यातील उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ आज शिवतिर्थावर घेत असतानाच त्याच दिवशी अमित ठाकरे यांची राजकारणातील मैदानात एन्ट्री झाली असल्याने ठाकरे परिवारासाठी मोठा योगायोग म्हणता येईल .


निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला तरी महाराष्ट्रात सरकारची स्थापना होत नसल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आले आहेत. गुरूवारी संध्याकाळी दादर येथील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेचा 20 वर्षानंतर मुख्यमंत्री होणार असला तरी प्रत्यक्ष ठाकरे घराण्यातील सुपूत्र ही धुरा सांभाळणार असल्याने ठाकरे घराण्यासाठी आणि शिवसेनेसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. शपथविधीचा सोहळा न भूतो न भविष्यतो करण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे .

एकीकडे हे होत असतानाच ठाकरे परिवारातील राज ठाकरे सुपुत्रही आजच्याच दिवशी राजकारणाची बाराखडी गिरवण्यास सुरवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय राजकारण करण्यास सुरुवात केली होती. पक्षाच्या बैठका, सभेला उपस्थित राहणाऱ्या अमित ठाकरे यांनी कधी मैदानात उतरून थेट सहभाग घेतला नव्हता . मात्र आज नवी मुंबईत पालिका कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमित ठाकरे रस्त्यावर उतरले.

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने सिवूड ते महानगरपालिका असा दोन किलोमीटर मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षापासून मनपा येथील साफसफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. मनसेने यावेळी थाळीनाद आंदोलन केले. घनकचरा, पाणी, साफसफाई, रूग्णालयातील 6500 कंत्राटी कामगारांची 14 महिन्याची थकबाकी 90 कोटी आणि घंटागाडी कामगारांना 43 महिन्याची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते, पालिका कामगार उपस्थित होते.