Facts: येणारा काळ मानवासाठी खूप कठीण असणार आहे. कोरोनानंतर (Corona) आता हवामान बदल (Climate Change) एवढा विध्वंस घडवून आणणार आहे की, येत्या काळात एक-दोन नव्हे तर तब्बल एक अब्ज लोक मृत्यूला बळी पडणार आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, पृथ्वीचा एखादा ठराविक भाग यामुळे बाधित होणार नाही, तर जगातील प्रत्येक कोपऱ्यातील माणसाचा या विनाशात समावेश असणार आहे. याबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात? हे जाणून घेऊयात सविस्तर... 


शास्त्रज्ञांचं म्हणणं काय?


वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाने नुकतंच हवामान बदलावर संशोधन केलं आहे. या संशोधनात त्यांनी वाढलेलं तापमान (Rising Temperature) भविष्यात मानवासाठी कसा मृत्यूचा विषय बनणार आहे हे सांगितलं आहे. या संशोधनाचे प्रमुख जोशुआ पियर्स यांच्या म्हणण्याप्रमाणे, मृत्यूची ही आकडेवारी येणाऱ्या पिढीसाठी भीतीदायक असणार आहे. मात्र, एक अब्ज लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारी ते म्हणाले की, कदाचित इतके लोक मरणार नाहीत, पण हे आकडे जवळपास इतके असू शकतात की, ज्यामुळे मानवाचा विध्वंस नक्कीच होईल.


माणसाने विध्वंसापासून वाचण्यासाठी काय करावं?


ही आपत्ती टाळण्यासाठी मानवाने प्रथम हवामान बदलाकडे लक्ष दिलं पाहिजे. यासोबतच कार्बन उत्सर्जनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावं लागणार आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, विविध संस्था नागरिकांना विविध गोष्टींतून होणारं कार्बन उत्सर्जन ताबडतोब रोखण्याचं आवाहन करत आहेत. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, पृथ्वीचं तापमान ज्या प्रकारे दरवर्षी वाढत आहे, त्यामुळे येत्या वर्षभरात हे जग आगीची भट्टी बनणार आहे.


शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मानवाने शक्य तितक्या लवकर मानवी जीवनासाठी घातक इंधनांचा वापर करणं थांबवावं. जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर देखील थांबवावा. खरं तर, जीवाश्म इंधन हे हवामान बदलासाठी सर्वात मोठं योगदान आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, सरकारने कार्बन कचरा व्यवस्थापन (Carbon Waste Management) आणि कार्बन डायऑक्साईड (Carbo dioxide) नैसर्गिकरित्या साठवण्यासाठी एखादं तंत्रज्ञान विकसित केलं तर ते हवामान बदलासाठी चांगलं ठरेल.


जगबुडीची देखील उद्भवू शकते समस्या


पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असणारं ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. या बेटाचा बराचसा भाग बर्फाने झाकलेला आहे. पण, गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधील बर्फ वेगाने वितळत आहेत. असंच सुरू राहिल्यास सखल भागातील मानवी वसाहतींचं अस्तित्व लवकरच धोक्यात येईल. जागतिक तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहेत. यासोबतच कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Waming) ध्रुवीय प्रदेशात हिमनद्यांचा बर्फ वितळत आहे. पृथ्वीवरील बर्फ वितळल्यास जगबुडी होण्याचा धोका आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


New Virus: मानवाने हे काय केलं? लाखो वर्षांपूर्वीचा व्हायरस पुन्हा होणार जिवंत; पृथ्वीचा होणार विनाश