New COVID Variant: जर तुम्ही विचार करत असाल की कोरोनाचा धोका आता संपला आहे, तर तुम्ही चुकत आहात. अर्थात कोरोनाची (Corona) तीव्रता कमी झाली आहे, पण कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोना व्हायरस त्याचं स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. BA.2.86 नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा आहे.
'या' देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या BA.2.86 ची माहिती दिली. जगभरातील अनेक देशांत BA.2.86 नावाचा कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. इस्रायल, डेन्मार्क, अमेरिका आणि यूके व्यतिरिक्त स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत हा कोरोना विषाणू आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग सध्या कमी
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची फारशी प्रकरणं आढळून आली नसली तरी या महिन्यात 19 ऑगस्टला 7 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर WHO (World Health Organization) त्यावर देखरेख करत असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या कोरोनाच्या नव्या BA.2.86 व्हेरिएंटची लागण जास्त लोकांना झाली नसली, तरी भविष्यात या विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. यासाठी कोरोनाच्या या विषाणूबद्दल अधिक जाणून घेऊया.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 नक्की काय आहे?
कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 याला पिरोला म्हणूनही ओळखलं जात आहे. हा कोरोना विषाणूचाच नवीन प्रकार आहे. जागतिक जीनोम सिक्वेन्सिंग डेटाबेस तयार करणारी संस्था GISAID नुसार, BA.2.86 मध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन (Mutation) आहेत, कोविडचा हा प्रकार वेगाने पसरतो. WHO ने देखील याला सर्वाधिक पसरणारा कोरोनाचा प्रकार म्हटलं आहे.
BA.2.86 किती घातक?
ओमायक्रॉन, अल्फा आणि डेल्टा अशा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा BA.2.86 पूर्णपणे वेगळा आहे. कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा BA.2.86 हा विषाणू 30 टक्क्यांहून अधिक वेगाने पसरतो, असं म्हटलं जातं. पुढे हा विषाणू किती गंभीर होऊ शकतो आणि त्याचा किती प्रमाणात प्रसार होऊ शकतो, याची माहिती कोणालाही नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या कोरोना व्हेरिएंटचा प्रकार फक्त एका देशात आढळला नाही, त्यामुळे हा विषाणू आधीच अनेक देशांमध्ये पसरला आहे, असं म्हटलं जातं.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 ची लक्षणं कोणती?
BA.2.86 हा कोरोनाचा नवीन प्रकार असल्याने, त्याची लक्षणं वेगळी किंवा अधिक गंभीर असू शकतात. तथापि, सीडीसी सल्ला देतं की, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी काही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. कोरोनाच्या या प्रकाराची लक्षणं पुढीलप्रमाणे असू शकतात.
- सर्दी
- डोकेदुखी
- थकवा
- सतत शिंका येणे
- घसा खवखवणे
- खोकला
- वास घेण्याची क्षमता कमी होणे
हेही वाचा:
India: सावधान! डॉक्टरांशी गैरवर्तन पडणार महागात; रुग्णावर उपचार नाकारण्याचा डॉक्टरांना मिळाला अधिकार