India: ऑगस्ट महिना सुरू झाला आहे... आणि याच महिन्यात भारताला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947 ला भारत शतकानुशतकं चालत आलेल्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताच्या (India) स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर तुम्ही शालेय पुस्तकांमध्ये वाचला असेल तर तुम्ही ब्रिटीश कंपनीच्या हुकूमशाहीबद्दलही वाचलं असेल. 1857 च्या क्रांतिनंतर ब्रिटिश राजघराण्याने भारताचा ताबा घेतला होता, त्यापूर्वी भारतावर एका ब्रिटीश कंपनीचं राज्य होतं. आता काळाची चाकं अशी फिरली आहेत की, ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर राज्य केलं, भारतीयांचा छळ केला, त्याच ब्रिटीश कंपनीचा मालक आज एक भारतीय आहे. या कंपनीचा इतिहास थोडक्यात पाहूया...
व्यापाराच्या उद्देशानं झाली होती कंपनीची स्थापना
सोळाव्या शतकात युरोपची शक्ती उदयास आली आणि त्याबरोबर वसाहतवादाला गती मिळाली. त्याच वेळी काही इंग्रज व्यापाऱ्यांनी मिळून ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली, ज्याचा मुख्य उद्देश भारताशी व्यापार करणं हा होता. या कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झाली आणि 1601 मध्ये जेम्स लँकेस्टरच्या नेतृत्वात ही कंपनी पहिल्यांदा भारतात पोहोचली.
व्यापारातून नंतर सत्तेत उतरले
ईस्ट इंडिया कंपनीच्या थॉमस रो यांना भारतात व्यापार करण्याचे अधिकार मिळाले, जे तत्कालीन मुघल सम्राट जहांगीरने मंजूर केले होते. 1608 मध्ये कंपनीची जहाजं सुरतमध्ये यायला लागली. कंपनीने 1611 मध्ये आंध्र प्रदेशातील मसुलीपट्टनम येथे पहिला कारखाना सुरू केला. काही वर्षांत कंपनीने कोलकाता (तेव्हा कलकत्ता), सुरतसह अनेक शहरांमध्ये तळ बनवले. हळुहळू कंपनीने व्यवसाय सोडला आणि राज्यकारभार सुरू केला. युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने फ्रान्स आणि पोर्तुगालचा पराभव केला. 1764 मधील बक्सरची लढाई ही सर्वात निर्णायक ठरली, ज्यामुळे भारतात कंपनीने आपली मुळं मजबूत केली. 1857 पर्यंत भारतावर कंपनीने अधिराज्य गाजवलं आणि आपली सत्ता कायम ठेवली, परंतु त्या वर्षीच्या क्रांतिनंतर ब्रिटीश राजाने कंपनीच्या हातून भारताची सत्ता हिसकावली.
पूर्वेकडे पोहोचली ब्रिटनची सत्ता
ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली भारतावरच नव्हे, तर चीनवरही राज्य केलं. ही कंपनी एकेकाळी ब्रिटीश शक्ती आणि पराक्रमांचं प्रतीक बनली होती. ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही अशी एक म्हण पूर्वी होती, ईस्ट इंडिया कंपनीने ही म्हण प्रत्यक्षात उतरवली.
1857 च्या क्रांतीने कंपनीची पडझड
काळ हा कधीच सारखा नसतो. ईस्ट इंडिया कंपनीवर क्लायमॅक्सनंतर पराभवाचे दिवस आले. 1857 च्या क्रांतिने ईस्ट इंडिया कंपनीचे वाईट दिवस सुरू केले होते. त्यानंतर कंपनीचे विशेषाधिकार काढून घेण्यात आले. यापूर्वी कंपनीकडे स्वत:चं सैन्य होतं, पण विशेषाधिकार काढून घेतल्याने कंपनीचं वर्चस्व कमी झालं. कंपनीच्या हातातून भारत काढून घेण्यात आला आणि नंतर कंपनीचा व्यवसाय संपूर्ण ढासळला.
काळाचं चक्र ब्रिटीशांवर उलटलं
2010 मध्ये इतिहासाचं चक्र पूर्ण झालं. भारताला लुटून एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत कंपनी बनलेली ईस्ट इंडिया कंपनी ही भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता (Sanjiv Mehta) यांनी विकत घेतली. त्यानंतर मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीला $15 दशलक्ष, म्हणजेच सुमारे 120 कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार केला.
ईस्ट इंडिया कंपनी आता करते 'हे' काम
एक काळ असा होता, जेव्हा व्यापार सोडून अनेक देशांत सत्ता आणि हुकूमत गाजवण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती. पूर्वी सर्व रेल्वे, जहाजं ईस्ट इंडिया कंपनीची होती. आता संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आता ही कंपनी चहा, कॉफी आणि चॉकलेटपासून भेटवस्तूंपर्यंत इतर अनेक वस्तू ऑनलाईन विकते.
हेही वाचा:
India: यूपीतील 'या' शहराला म्हणतात 'सिटी ऑफ लाईट', जाणून घ्या काय आहे यामागचं कारण