Flesh Eating Bacteria : लहानपणी खेळताना अनेक वेळा आपण पडतो आणि आपल्याला दुखापत होते. काही मुलं पालकांच्या भीतीने दुखापत लपवतात. काही वेळेस अशी दुखापत नंतर गंभीर स्वरुप घेते. अनेक वेळा आपण दुखापतीवर घरीच उपचार करतो किंवा पेन किलर घेतो. पण असं करणं योग्य आहे का? अमेरिकेतील एका चिमुकल्यासोबत जे घडलं ते वाचून तुम्हाला हा प्रश्न नक्की पडेल. अमेरिकेमध्ये शरीरावरील जखमेतून एका मुलाच्या शरीरामध्ये बॅक्टेरिया शिरला. हा जीवाणू इतका प्राणघातक होता की या बॅक्टेरियानं मुलाचं शरीर आतून पूर्णपणे कुरतडलं आणि यामुळे अखेरिस या मुलाचा मृत्यू झाला.


नक्की काय घडलं?


अमेरिकेत ट्रेडमिलवर धावताना 11 वर्षांचा मुलगा पडला. पडल्यानंतर त्याच्या पायाला-घोट्याला दुखापत झाली. मुलाला ज्या ठिकाणी दुखापत झाली, तिथे आधी गडद तपकिरी रंगाचा व्रण तयार झाला. कालांतराने याचा रंग जांभळा आणि नंतर लाल रंगात बदलला. या मुलाच्या पालकांना दुखापत अधिक गंभीर झाल्याचं समजलं आणि त्यांनी मुलाला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात मुलाची तपासणी केली. तपासणीमध्ये डॉक्टरांना मुलाच्या शरीरात विचित्र संसर्ग झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर मुलाला त्वरीत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.


या प्रकरणात अधिक तपासणी केल्यावर आढळून आलं की, मुलाला मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला. हा मांस खाणारा जिवाणू चिमुकल्याच्या दुखापतीतून त्याच्या शरीरात शिरला आणि त्याने मुलाच्या शरीराला आतून कुरतडण्यास सुरुवात केली. यानंतर काही दिवसांनंतर मुलाच्या मेंदूला सूज आली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.


'या' संसर्गामुळे भारतातही एक मृत्यू


दरम्यान, भारतातही काही वर्षांपूर्वी याच संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये या संसर्गामुळे 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. वैद्यकीय भाषेत या विषाणूला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस म्हणतात.


मांस खाणारा बॅक्टेरिया


मांस खाणारा बॅक्टेरिया याला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस (Necrotizing Fasciitis) या नावानं ओळखलं जातं. हा बॅक्टेरिया त्वचेचा दुर्मिळ संसर्ग आहे. हा जीवाणू शरीरातील पेशी आणि ऊती नष्ट करतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास हा प्राणघातक ठरू शकतो. नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस संक्रमित व्यक्तीच्या शरीरात झपाट्याने पसरतो. यामुळे त्वचा आणि त्याखालील ऊती नष्ट होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.


हा जीवाणू कसा हल्ला करतो


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातील मांस खाणारा हा विचित्र जीवाणू त्वचेला आणि त्याखालील ऊतींना गंभीरपणे संक्रमित करतो. हा खूप वेगाने पसरतो आणि त्यावर वेळीच योग्य उपचार न केल्यास तो कोणत्याही माणसाचा जीव घेऊ शकतो. नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस (Necrotizing Fasciitis) जीवाणी थेट रक्तवाहिन्यांवर हल्ला करतो. हा हल्ला इतका धोकादायक आहे की, यामुळे शरीराला रक्तपुरवठा होणं पूर्णपणे थांबतं. अमेरिकेत दरवर्षी सरासरी 600 ते 700 रुग्ण या धोकादायक बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. या संसर्गापैकी 25 ते 30 टक्के लोकांचा मृत्यू होतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mystery Train : गोष्ट एका रहस्यमयी ट्रेनची, बोगद्यात गेली अन् झाली गायब; 100 वर्षानंतरही सुरु आहे शोध