Zanetti Train Mystery : तुम्ही बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) बद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. जिथे गेलेला कोणताही माणूस, विमान किंवा जहाज जिवंत परतलेला नाही असं सांगितलं जातं. बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य अद्याप कायम आहे. अशाच एका रहस्यमयी ट्रेनचीही गोष्ट सांगितली जाते. ही ट्रेन एका बोगद्यात शिरली आणि गायब झाली. तब्बल 100 वर्षांनंतरही आतागायत या ट्रेनचा शोध सुरु आहे. अद्याप या ट्रेनचा थांगपत्ता लागलेला नाही. ही गायब झालेली ट्रेन जणू एक रहस्यच बनलं आहे.


गोष्ट एका रहस्यमयी ट्रेनची, बोगद्यात गेली अन् झाली गायब 


एक ट्रेन प्रवासासाठी निघाली त्यामध्ये सुमारे 104 प्रवासी होते. ट्रेन सुरळीत सुरु झाली. प्रवासावेळी ट्रेन एका बोगद्यात शिरली खरी पण त्या बोगद्यातून ट्रेन बाहेर आलीच नाही. आता या घटनेला 100 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र या ट्रेनचं गुपित अद्याप कायम आहे. ही घटना इटलीमधील आहे. या ट्रेनसह त्यातील सर्व प्रवासी गायब झाले. या घटनेला जवळपास 100 वर्षे उलटून गेली आहेत, पण आजतागायत ट्रेन सापडलेली नाही शिवाय त्यामधील प्रवाशांचा सुगावा लागलेला नाही.


काय आहे नेमकी घटना?


1911 मध्ये इटलीच्या झेनेटी (Zenetti) रेल्वे कंपनीने एक नवीन ट्रेन (Zenetti Train) बनवली होती. या ट्रेनचे डब्बे आणि इंजिनपर्यंत सर्व काही नवीन होतं. कंपनीने ट्रायल म्हणून या ट्रेनमधून प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची ऑफर दिली. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांसह सुमारे 104 जण ट्रेनमध्ये चढले. ट्रेन काही अंतरावर गेली पण, ट्रेनच्या प्रवासात एक बोगदा आला आणि ट्रेन बोगद्याच्या आत शिरली. ट्रेन बोगद्याच्या आत शिरली मात्र बाहेर पडलीच नाही. सर्व प्रवाशांस बोगद्यात गेलेली ट्रेन दिसेनाशी झाली. पुढील स्टेशनवर लोक ट्रेनची वाट पाहत राहिले, पण ही ट्रेन तिथे पोहोचलीच नाही.


दोन प्रवासी ट्रेनमधून उतरण्यात यशस्वी


ट्रेन बोगद्यात घुसली, त्यावेळी दोन प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्याचं सांगण्यात येतं. ट्रेनमधून उतरलेले हे दोन प्रवाशी काही वेळाने बचाव पथकाला भेटला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन प्रवाशांपैकी एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेवर काहीही बोलण्यास नकार दिला. तर दुसऱ्या प्रवाशाने सांगितलं की, ट्रेन बोगद्यात जाताच अचानक गायब झाली आणि तो ट्रेनमधून कसा बाहेर आला, हे त्याला स्वतःलाच काही माहिती नाही.


ट्रेनने टाईम ट्रॅव्हल केलं?


या ट्रेनने टाईम ट्रॅव्हल केला, अशी अफवा या ट्रेनबद्दल पसरली आहे. त्यामुळे ती टाईम ट्रॅव्हल करुन बोगद्यातून गायब होऊन दुसऱ्या जगात पोहोचली, असं सांगितलं जातं. मात्र, आतापर्यंत वैज्ञानिकांना बेपत्ता ट्रेनचा कोणताही सुगावा लागलेला नाही. मात्र काही वर्षानंतर या ट्रेनचे काही भाग रशिया, युक्रेन आणि जर्मनीमध्ये सापडल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, याचा ठोस पुरावा सापडलेला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Well Shape : कधी विचार केलाय? विहीर गोल आकाराची का असते, चौकोनी किंवा त्रिकोणी का नाही? यामागे आहे 'हे' कारण