Reusable Water Bottles: तुम्ही जर स्टील, प्लॅस्टिक किंवा कॉपरच्या बाटलीतून पाणी पित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमच्या या बाटलीपेक्षा तुमचे टॉयलेट सीट जास्त स्वच्छ असते, वारंवार वापरल्या जाणार्‍या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असल्याचा दावा अमेरिकेतील एका संशोधनात करण्यात आला आहे. 


वारंवार वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांबाबत एका संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे. या बाटल्यांमध्ये सरासरी टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असून ते मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत असा या अभ्यासातून दावा केला आहे. त्यामुळे आपल्याला आतड्यासंबंधी रोगही होऊ शकतो असंही म्हटलं आहे. 


आपण सर्वजण बाटलीबंद पाणी पितो. आपण कुठेही गेलो, ऑफिसला गेलो किंवा फिरायला गेलो तर आपल्यासोबत आपली पाण्याची बाटली ही असतेच. त्यातल्यात्यात जरा चांगली दिसणारी, चांगली टिकणारी स्टीलची वा कॉपरची बाटली किंवा तांब्याची बाटली विकत घेण्याकडे सर्वांचा कल असतो. बरेच लोक त्यांच्याकडील ही बाटली आठवड्यातून एकदा तर काही आठवड्यातून दोन-तीनदा धुतात. त्यामुळे त्या साफ झाल्या आहेत असं वाटतं. पण या पाण्याच्या बाटल्या प्राणघातकही ठरू शकतात, याचा आपण कधीच विचार करत नाही. पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्या अत्यंत धोकादायक असतात असं या संशोधनात सांगितलं आहे. 


अमेरिकास्थित वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉमच्या संशोधकांच्या टीमला एका संशोधनात आढळून आले आहे की वारंवार वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटपेक्षा सरासरी सुमारे 40,000 पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. संशोधकांच्या चमूने या बाटल्यांचा आणि त्याच्या टोपणांचा अभ्यास केला. त्यामध्ये बॅक्टेरिया असल्याचं त्यांना आढळून आलं. 


याव्यतिरिक्त संशोधकांनी बाटल्यांच्या साफसफाईची तुलना घरगुती वस्तूंशी केली. स्वयंपाकघरातील सिंकपेक्षा दुप्पट जंतू या बाटल्यांमध्ये असतात. यात संगणकाच्या माऊसपेक्षा चार पट अधिक बॅक्टेरिया आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या भांड्यापेक्षा 14 पट अधिक बॅक्टेरिया असू शकतात. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. अँड्र्यू एडवर्ड्स म्हणाले की, या बाटल्यांमुळे माणसांचे तोंड आता जंतूंचे घर बनले आहे. 


पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटल्या दिवसातून एकदा तरी गरम पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवाव्यात असं या संशोधनातून सांगितलं आहे. 


ही बातमी वाचा: