20 Crore Dog : आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे पाळीव प्राणी पाहिले असतील. आपल्या पाळीव प्राण्यांना चांगली लग्झरी ट्रीटमेंट देण्याचा अनेक श्वानप्रेमी प्रयत्न करतात. पण, बेंगळुरूमधील एका व्यक्तीने अशाच एका खास जातीचा श्वान विकत घेतला आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील एका श्वानप्रेमीने एक दुर्मिळ कॉकेशियन शेफर्ड श्वान (Caucasian Shepherd breed dog) विकत घेतला आहे. या श्वानाची किंमत तब्बल 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचे नाव सतीश असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्येही त्यांचे श्वानाचे घर आहे. त्यांनी हैदराबाद येथील एका ब्रीडरकडून कॉकेशियन जातीचा हा दुर्मिळ श्वान विकत घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कॅडबॉम हैदर' या श्वानाचे वय 1.5 वर्ष आहे. विशेष म्हणजे, हा डॉग शोमध्येही सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने अनेक पदकेही जिंकली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्वानाचे मालक सतीश यांनी सांगितले की, 'कॅडबॉम हैदर' आकाराने खूप मोठा आहे. हा एक अतिशय अनुकूल श्वान आहे. तो घरी आरामात राहतो.


सतीश हे महागडे आणि दुर्मिळ जातीचे श्वान विकत घेण्यासाठी ओळखले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 2016 मध्ये, कोरियन मास्टिफ जातीचा श्वान पाळणारे ते भारतातील पहिले व्यक्ती होते. या श्वानांची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 


काय आहे या श्वानाचं वैशिष्ट्य?


कॉकेशियन शेफर्ड हा रक्षक श्वान म्हणून ओळखला जातो. हा श्वान स्वभावाने अगदी निडर आहे. हे श्वान त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावासाठी देखील ओळखले जाते. ही जात विशेषतः जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, ओसेशिया, दागेस्तान आणि रशियाच्या काही भागात आढळते.


या जातीच्या श्वानांचा वापर परदेशात हिवाळ्यात घरांच्या संरक्षणासाठी केला जातो. हे श्वान लांडगे आणि कोयोट्स सारख्या भक्षक प्राण्यांपासून देखील प्राण्यांचे संरक्षण करतो. पूर्ण वाढ झालेला कॉकेशियन शेफर्ड 70 किलोपेक्षा जास्त वजनाचा असू शकतो. त्याची उंची सुमारे 30 इंच असू शकते. या जातीचे आयुष्य 10 ते 12 वर्ष असते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video : काय तो रुबाब! महागड्या हार्ले डेव्हिडसनवर दूध विकणारा अवलिया, श्रीमंती पाहून व्हाल थक्क; व्हिडीओ व्हायरल