मुंबई : भारतानं अंतराळ संशोधनात नवा इतिहास रचला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं दाखवत भारत जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देत आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणि भारताचं सर्वत्र कौतुक होत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जेव्हा अवकाशाचा विषय निघतो, तेव्हा भारताचे पहिले आणि एकमेव अंतराळवीर राकेश शर्मा (Rakesh Sharma) यांचा उल्लेख येतोच. अंतराळवीर राकेश शर्मा हे अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय आहेत. आता चांद्रयान-3 च्या यशानंतर राकेश शर्मा यांच्या अंतराळ मोहिमेचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांच्यासोबत संवाद साधला होता. यावेळी अंतराळातून पृथ्वी कशी दिसते याचं वर्णन राकेश शर्मा यांनी अतिशय सुंदर शब्दांत केलं होतं.
पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा
पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा भारतीय वायुसेनेचे एक पायलट होते. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये अंतराळ मोहिमेत सहभाग घेतला होता. ते अंतराळ मोहिमेत सहभागी झालेले पहिले भारतीय नागरिक होते. राकेश शर्मा यांनी सोवियत संघाच्या सोव्हिएत इंटरकोसमॉस या अंतराळ मोहिमेत सामील झाले होते.
अंतराळातून पृथ्वी कशी दिसते?
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळातील राकेश शर्मा यांच्यासोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राकेश शर्मा यांना विचारलं होतं की, अंतराळातून भारत कसा दिसतो. या प्रश्नावर राकेश शर्मा यांनी दिलेलं उत्तर देशभक्तिपर होतं.
इंदिरा आणि राकेश शर्मा यांच्यात काय संवाद झाला?
राकेश शर्मा जेव्हा अंतराळात पोहोचले, तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधताना सांगितलं की, संपूर्ण देशाचे लक्ष तुमच्याकडे आहे आणि आम्ही तुमचं अभिनंदन करतो. मला आशा आहे की, यामुळे आपल्या देशाला अवकाशाची जाणीव होईल. यादरम्यान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांना त्यांच्या कठोर अंतराळ प्रशिक्षणाबद्दल प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर देताना राकेश शर्मा म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे आज त्यांना मोहिमेमध्ये कमी त्रास झाला, हे प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे.
पाहा व्हिडीओ :
राकेश शर्मा यांनी केलेलं अवकाशातील भारताचं वर्णन
अवकाशातून पृथ्वी कशी दिसते याचं उत्तर देताना राकेश शर्मा यांनी म्हटलं होतं की, ''सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा...'' यानंतर इंदिरा यांनी राकेश शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ज्यावर राकेश शर्मा म्हणाले की, ''आम्ही येथे ठीक आहोत, येथे कोणतीही अडचण नाही.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :