BRICS Summit South Africa: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर आहेत. भारताने इतिहास घडवल्याबद्दल तिथेही भारताचं कौतुक होत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा (PM Modi) एक फोटो देखील समोर आला आहे, ज्यात ते दक्षिण आफ्रिकेतील एक वृत्तपत्र (Newspaper) वाचताना दिसत आहेत, ज्याची हेडलाईन (Headline) भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेबद्दल आहे.


"इंडियाज मोदी आऊट ऑफ दिस वर्ल्ड"


दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्राने इंग्रजीत हेडलाईन लिहिली आहे - "India's Modi out of this world." ब्राझिलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Luiz Inácio Lula da Silva) हे देखील पंतप्रधान मोदींसोबत वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावरील हास्यच सारं काही सांगून जातं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (24 ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तपत्राची हेडलाईन वाचताना पंतप्रधान मोदींचा हा फोटो शेअर केला आहे.






चांद्रयान-3 मोहिमेबद्दल इस्रो आणि मोदींचंही केलं कौतुक


जेव्हा बुधवारी (23 ऑगस्ट) भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत होती, तेव्हा पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाशी जोडले गेले होते. दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्राने यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल भारताचं अभिनंदन करताना इस्रो आणि पंतप्रधान मोदींचं देखील कौतुक केलं आहे.


दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांच्या वृत्तपत्रांतील पहिल्या पानावर भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम झळकली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट-लँड होताच, पंतप्रधान मोदींनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना जोहान्सबर्ग येथून फोन केला आणि त्यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं.


पंतप्रधान मोदी म्हणाले - हे अवघ्या मानवजातीचं यश


जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु हे यश एखाद्या देशाचं यश म्हणून न स्वीकारता, संपूर्ण मानवजातीचं महत्त्वाचं यश म्हणून स्वीकारलं जावं. जागतिक नेत्यांचे आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, भारताचा अंतराळ कार्यक्रम नेहमीच जगाच्या कल्याणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.


हेही वाचा:


Chandrayaan 3: 'जेव्हा राकेश रोशन चंद्रावर गेले होते, तेव्हा...'; चांद्रयान 3 चं अभिनंदन करताना हे काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?