कल्याण :  कल्याणमध्ये (Kalyan) पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीची हत्या झाली होती. यामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ माजली होती. कल्याण परिसरातील या गुन्हेगारी प्रवृत्तीला दोन गँग जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. पण याच गँगमधील एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. हत्या झालेल्या तरुणाचं समीर लोखंडे असं नाव आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. इतकंच नव्हे तर या प्रकरणात केडीएमसीचे भाजपचे उपमहापौर विक्की तरे यांचे निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं आहे. 


नेमकं काय घडलं?


कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. समीर लोखंडे या मुलाचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण केले. त्यानंतर या तरुणांनी त्यावा बेदम मारहाण केली. त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली की, यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्या तरुणांनी त्याचे अपहरण करुन मारहाण केली त्याचे दोन दिवसांपूर्वी त्याच लोकांशी भांडण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास करण्यात येत आहे. 


कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात


या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे. मुकेश आणि निरज दास या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश या आरोपींमध्ये आहे.  या प्रकरणात आकाश जैसवाल या तरुणालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश जैसवाल हा केडीएमसीचा माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. ही घटना घडली तेव्हा तो कोळसेवाडी पोलीस स्थानकातच होता. पण हत्या झालेल्या तरुणाने फिर्यादीमध्ये त्याचे नाव घेतले. त्यामुळे त्याचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


कल्याण पूर्व परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ


सध्या कल्याण पूर्व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान कल्याण पूर्वेत अभिजित कुडळकर आणि विशाल हे दोघे जण गँग चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या विरोधात देखील कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. सध्या हे दोघेही जण कारागृहात आहेत. परंतु तरीही त्यांचे हस्तक अजूनही सक्रिय आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या अल्पवयीन तरुणाची हत्या यामध्ये झाली त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुलींच्या क्लासेसच्या वेळा बदला, कोचिंग क्लासेस-शाळा परिसरात पोलिसांच्या गस्त वाढवा; कल्याणमधील घटनेनंतर महिला आयोगाच्या पोलिसांना सूचना