ठाणे : कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून एका 12 वर्षाच्या मुलीची हत्या झाल्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी कल्याण पोलिसांची भेट घेतली. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घ्या, शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवा, तसेच कोचिंग क्लासेसच्या वेळा बदलण्याच्या सूचना त्यानी दिल्या.


एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणाने बारा वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास कल्याणमध्ये घडली होती. या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाबरिया यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाचा आढावा त्यांनी घेतला.


पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासा संदर्भात मयत मुलीचा, तिच्या कुटुंबीयांचा मोबाईल तपासा, आरोपीची पार्श्वभूमी तपासा, ती मुलगी ज्या कोचिंग क्लासमध्ये होती त्या क्लासमध्ये याबाबत चौकशी करा आदी सूचना दिल्याचे महिला आयोगाच्या सदस्या छाबरिया यांनी सांगितले.


या भेटीदरम्यान छाबरिया यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करा, कोचिंग क्लासेसच्या वेळा उशिरा आहेत त्यामुळे त्यांना लवकर क्लासेस घेण्याच्या सूचना करा, क्लासेसच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवा, कल्याण पूर्व परिसरात अशा घटना घडत असल्याने संपूर्ण परिसरात सातत्याने पेट्रोलिंग सुरू करा अशा सूचना पोलिसांना दिल्या. तसेच या परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.


काय आहे घटना? 


कल्याण तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणानं अल्पवयीन मुलीवर चाकूनं आठ वार केले. त्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. संबंधित मुलगी नेहमी रात्री आठच्या सुमाराला ट्यूशनवरून परतायची. बुधवारी संध्याकाळी देखील ती ट्यूशनला गेली होती. 


आरोपी आदित्य कांबळे काल संध्याकाळी सातपासूनच मुलगी राहत असलेल्या दुर्गा दर्शन सोसायटीत होता. संबंधित मुलगी किती वाजता परत येते, असं तो तिथल्या रहिवाशांना विचारत होता. तो कुठल्या हेतूनं विचारतोय, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. रात्री आठच्या सुमाराला मुलगी तिच्या आईसोबत परतली आणि दोघी पायऱ्या चढू लागल्या. त्यावेळी आदित्य दबा धरून बसलाच होता. त्यानं जिन्यातच तिच्यावर तब्बल आठ वार केले. आईनं मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यनं आईला ढकलून दिलं. छातीवर अनेक वार झाल्यानं मुलगी तिथंच कोसळली. तिला तात्काळ शेजारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 


दरम्यान, आरोपी आदित्य कांबळे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र सोसायटीतील रहिवाशांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.


संबंधित बातमी: