ठाणे : डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झाला आहे. सीए झाल्यावर या मुलांने त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय. सीए झालेल्या योगेश ठोंबरे यांच्यावर सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या निमित्ताने योगेशच्या आई नीरा ठोंबरे यांच्याही संघर्षाची आता तेवढीच चर्चा होत आहे. पतीचे निधन झाल्यानंतर नीरा ठोंबरे यांनी अपार मेहनत घेतली. दिवस-रात्र कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलंय.
आई नीरा ठोंबरे यांचे तोंडभरून कौतुक
योगेश ठोंबरे हा तरुण सीए झाला असला तरी त्यामागे नीरा ठोंबरे यांचे अपार कष्ट आहेत. त्यांनी रस्त्यावर भाजी विकून आपल्या मुलाला सीए केलंय. म्हणूनच योगेशसोबतच त्याची आई नीरा ठोंबरे यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
"25 वर्षांची असताना पतीचे निधन "
योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावामध्ये राहतो. योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. गेल्या 25 वर्षांपासूनच्या संघर्षाबद्दल त्यांनी एबीपी माझाला सविस्तर माहिती दिली आहे. "मी फार गरिबीत दिवस काढले. 25 वर्षाची असताना माझ्या पतीचे निधन झाले. तेव्हापासून मी माझ्या मुलांना सांभाळलं. मी माझ्या मुलांना काही कमी पडू दिलं नाही. मी कोणासमोरही हात पसरले नाही. कष्ट करून माझ्या मुलांना वाढवलं. माझ्या मुलाची एक जिद्द होती. आई काबाडकष्ट कर पण मला सीए होण्यासाठी मदत कर, असं माझा मुलगा मला सांगायचा. पण आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली आहे," असं ठोंबरे काकूंनी सांगितलं.
पाहा योगेशच्या आईने काय सांगितलं?
"आम्ही ही मुलं ठेवतो तू तुझं बघ"
माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर आम्ही तीन महिने घरातच होतो. तेव्हा आमच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली. त्या काळात आम्हाला कोणीही मदत केली नाही. पतीचे निधन झाल्यानंतर तीन महिन्यांनी मी भाजी विकण्याचा व्यवसाय चालू केला आणि माझ्या मुलाचा सांभाळ केला. माझ्या पतीचे निधन झाले त्यानंतर पतीच्या तेराव्याला माझ्या सासरची सगळी माणसं बोलायला लागली की, आता आम्ही ही मुलं ठेवतो तू तुझं बघ. पण मी त्यांना सांगितलं की माझी मुलं जिथं राहतील तिथंच मीही राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
"लोक मला कॅटबरी, पैसे देतायत"
मुलगा सीए झाल्यावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या अभिनंदानावरही त्यांनी भाष्य केलं. "मला खूप आनंद होत आहे. लोक मला कॅटबरी, पैसे देत आहेत," असं त्यांनी हसत हसत सांगितलं. दरम्यान आता योगेश ठोंबरे हा तरुण सीए झाला आहे. त्यामुळे नीरा ठोंबरे आता आनंदी आहेत. जीवनाचे पांग फिटल्याची, कष्टीचे चिज झाल्याची त्यांची भावना आहे.
हेही वाचा :
Rohit Patil CA : ट्रॅक्टरचालक शेतकऱ्याचा मुलगा CA झाला, आई बापाच्या कष्टाचा पांग फेडला ABP Majha