ठाणे : स्टेशनवरील स्काय वॉकवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, आम्ही एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा विनंती करू, पण त्यानंतरही अधिकारी ऐकत नसतील तर चौथ्या वेळी जी काही कारवाई करू ती समोरासमोर करू असा सज्जड दम खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी केडीएमसीसह (KDMC) रेल्वे अधिकाऱ्याना दिला. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी कल्याण रेल्वे स्टेशनवरील समस्यांचा आढावा घेतला. तसेच प्रवासी संघटनांशी चर्चा केली. यावेळी खासदार म्हात्रे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना केल्या.


भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी कल्याण रेल्वे स्टेशनची पाहणी केली. यावेळी  खासदार म्हात्रे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, नागरिकांशी चर्चा करत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीस केडीएमसीचे अधिकारी उपस्थित होते.


कल्याण रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह वाढवण्यात यावेत, त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यात यावी, स्काय वॉकवर अनधिकृतपणे अतिक्रमण करणारे फेरीवाले महिलांची छेडछाड करतात, प्रवाशांना त्रास देतात अशा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार म्हात्रे यांनी यावेळी रेल्वे अधिकार्‍यासह केडीएमसी प्रशासनाकडे केली.


छोट्या-छोट्या समस्याही सोडवता येत नाहीत


अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटना, प्रवाशी या समस्यांबाबत तक्रारी करत आहेत, मात्र अद्यापही समस्या सुटल्या नसल्याने म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. लोकलच्या फेऱ्या वाढवणे हा मोठा विषय आहे, मात्र रेल्वे स्टेशनवर स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, फेरीवाल्यांचा अतिक्रमण हे छोटे छोटे विषय अद्याप सुटलेले नाहीत असे म्हात्रे यांनी सांगितले. या समस्या कधी सुटतील याचा कालावधी मला सांगा, पुढच्या आठवड्यात मी पुन्हा रेल्वे स्टेशनची पाहणी करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.


हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा


भिवंडी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. याबाबत बोलताना विद्यमान खासदार सुरेश मात्रे यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना थेट आव्हान दिलं. यावेळी बोलताना खासदार म्हात्रे म्हणाले की, "मी लोकसभेतदेखील चॅलेंज केलं होतं, आता देखील करतोय. लोकांनी कपिल पाटील यांना स्पष्ट नाकारलं, कपिल पाटील यांनी सत्तेत असताना काय केलं? मुरबाड असेल कल्याण पश्चिम असेल, कपिल पाटील यांनी उभं राहून दाखवावं, पुन्हा जनताच चारीमुंड्या चित करून दाखवेल."


ही बातमी वाचा: