Rohit Patil CA : ट्रॅक्टरचालक शेतकऱ्याचा मुलगा CA झाला, आई बापाच्या कष्टाचा पांग फेडला ABP Majha

Rohit Patil CA :

कोल्हापूर : देशामध्ये सर्वात कठीण समजल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला.या परीक्षेत कोल्हापूर विभागातून 40 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. कोल्हापूर विभागातून 340 विद्यार्थी यामध्ये परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी यशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगावमधील रमेश पाटील या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याच्या मुलानं चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेला गवसणी घालत यश खेचून आणलं आहे. रोहित पाटील असं त्याचं नाव आहे. रोहितच्या यशानं आई बापाच्या कष्टाचा पांग फिटला आहे. घरची शेतीच्या कामात मदत करत हे यश मिळवलं आहे. त्यामुळे मुलाच्या यशाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले.

सीए होत आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला

रोहितला तिसऱ्या प्रयत्नात सीए परीक्षेत यश मिळालं. गिरगाव गावाला सैनिकी परंपरा लाभली असताना वेगळं ध्येय उराशी बाळगताना रोहितने सीए परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे सीए होत आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला. रमेश पाटील गिरगावमध्ये ट्रॅक्टर चालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर त्यांच्या पत्नी सुद्धा शेतीमध्ये त्यांना मदत करत असतात. रोहितने प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवताना परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये रोहितला आई वडिलांसह सीए अमित गावडे यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola