मुंबई: ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केली नाही, या दोन्ही जागा कुणाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. या जागा कुणाकडे जातील हे केंद्रीय समिती ठरवेल असंही ते म्हणाले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे तर कल्याणमधून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी भाजपची ही रणनीती आहे का याची चर्चाही सुरू आहे. 


राज्यातून लोकसभेसाठी महायुतीचे 45 खासदार निवडूण आणून नरेंद्र मोदी यांना ताकद देण्याचं नियोजन भाजपने आखलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपन राजकीय डावपेचही टाकायला सुरूवात केली आहे. महायुतीमध्ये आता अजित पवार गटही सामील झाल्यामुळे हे सहज शक्य होईल असा भाजपचा होरा आहे. पण जागावाटप करताना मात्र महायुतीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. 


Shrikant Shinde On Kalyan Lok Sabha : कल्याणचा खासदार मीच होणार, श्रीकांत शिंदे यांचा दावा 


या आधी कल्याणच्या जागेवरून वाद  सुरू होता. ही जागा भाजपला मिळावी यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यावरून कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सततच्या कुरबुरी सुरू होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदरा श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्ते कुठेतरी शांत झाल्याचं दिसून आलं होतं. 


खासदार श्रीकांत शिंदे यांनी या आधी वक्तव्य करताना कल्याणची जागा शिवसेनेलाच मिळणार असून त्या ठिकाणचा पुढचा खासदारही आपणच असणार असं ठामपणे सांगितलं होतं. आता मात्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताज्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे कल्याणच्या बदल्यात ठाण्याची जागा भाजप शिंदे गटाकडून घेऊ शकते अशी चर्चाही सुरू आहे. 


शिंदे गटाचा 22 जागांवर दावा, भाजप 13 जागा सोडण्यास तयार? 


दरम्यान शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभेचे 13 खासदार असल्याने या 13 जागा सोडण्यास भाजप तयार आहे. पण उर्वरित जागांचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न आहे. तसेच अजित पवार गटालाही लोकसभेच्या जागा द्याव्या लागणार आहेत. 


ही बातमी वाचा: