कल्याण, ठाणे : मागील काही काळापासून राज्यातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कॅबमध्ये (Cab) प्रवासादरम्यान तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police Kalyan) तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर आरोपी राकेश जयस्वाल याला नवी मुंबईतील (Navi Mumbai Airoli) ऐरोलीमधून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 23 वर्षीय तरुणी ही कल्याण पूर्वेतील नेतेवली भागात राहत असून ती नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. त्यातच पीडित तरुणी ही नवी मुंबई येथे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कामावर गेली होती. त्यानंतर. (शनिवारी) 14 ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास कंपनीमधील काम आटोपून घरी जाण्यासाठी पीडितेने कॅब कंपनीची कार बुक केली होती. कॅब कारमध्ये बसून ती घरच्या दिशेने प्रवास करत असताना कार कल्याण शीळ मार्गावरील सूचक नाका येथे आली. त्यावेळी पीडित तरुणी कॅबमध्ये झोपली होती. ही संधी साधताच चालक राकेश याने पीडित तरुणीवर कारमध्येच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घृणास्पद कृत्यामुळे पीडित तरुणीने आरडा ओरडा केला. त्यावेळी घाबरलेल्या नराधम कॅब चालकाने पीडित तरुणीला पहाटेच्या तीन वाजल्याच्या सुमारास सूचक नाका रस्त्यावर सोडून पळ काढला होता.
दरम्यान या घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठले. पीडित तरुणीने कॅब चालकाविरोधात भादंवि कलम 354, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशुमख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आले. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. अखेर कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तपास करत कॅब चालक राकेश जयस्वाल याला नवी मुंबई ऐरोली येथून बेड्या ठोकल्यात. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. डोके करीत आहेत. मात्र या घटनेमुळे महिला प्रवाशी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.