भिवंडी : दिवाळीच्या सुट्टीत बंद घरांना हेरून  लक्ष्य करून घरफोडीच्या (Theft) घटना सध्या मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच भिवंडीत शांतीनगर परिसरात घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या सहा तासांमध्येच हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली. या दोन्ही आरोपींकडून  चोरी केलेले 1 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 34 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. 


दिवाळी निमित्ताने अनेक जण घराबाहेर पडत असतात.  अशावेळी बंद घरांना हेरून त्या घरांमध्ये घरफोडी सारख्या घटनांमध्ये वाढ होत होती. असाच भिवंडी शहरातील गायत्री नगर परिसरात दिवाळीच्या सुट्टीत बाहेर गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचे टाळे तोडून घरात प्रवेश करून घराच्या कपाटातून सोन्या चांदीचे दागिने त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली आणि तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.  घरात चोरी झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली तेव्हा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करु घेतला. त्याप्रमाणे पोलिसांनी चोरट्यांचा शोध देखील सुरु केला. 


फिर्यादी कडे विचारपूस केली असता फिर्यादीने सांगितले हे दागिने त्यांनी मुलीच्या लग्नासाठी सांभाळून ठेवले होते. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात दोघा चोरट्यांचा शोध लावला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या . रेहान अन्सारी वय 22 वर्ष आणि दानिश अन्सारी वय 28 वर्ष अशी आरोपींची नावे आहेत.  अटक आरोपींकडून तब्बल 1 लाख 61 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.


हेही वाचा : 


Solapur Crime News : दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ, जन्मदात्या बापाचा मुलांनीच काढला काटा; खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा