ठाणे : सिंग्नल नसल्याने गाडी थांबल्याची संधी साधली आणि 15 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीला टिटवाळा रेल्वे स्थानकातून फूस लावून मित्रानेच अपहरण केल्याची घटना समोर आली  आहे. इगतपुरीवरून पुष्पक एक्स्प्रेसने (Pushpak Express) कल्याणकडे येत असताना टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे. प्रशांत सोनवणे असे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. 


लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 15 वर्षीय अल्पवीयन मुलगी डोंबिवली पूर्वेतील शेलार चौक भागात आई वडिलांसह राहते. त्यातच पीडित मुलगी इगतपुरीला नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून गेली होती. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीने घरच्यांना मोबाइलवर संपर्क करून  इगतपुरीवरून पुष्पक एक्स्प्रेसने  कल्याणला उतरून डोंबिवलीला घरी येणार असल्याचे सांगून प्रवासाला निघाली होती. मात्र  पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकात येऊन मुंबईच्या दिशेने  निघून गेली.


दुसरीकडे पीडित मुलगी रात्री 11 वाजले तरी घरी पोहचली नसल्याचे पाहून पीडित मुलीच्या वडिलांनी तिला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईल बंद येत होता.  त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिच्या एका मैत्रिणीकडे तिची चौकशी केली असता, ती टिटवाळा रेल्वे स्थनाकानजीक पुष्पक एक्स्प्रेसला सिंग्नल नसल्याने ट्रेनमधून उतरून तिचा मित्र असलेला प्रशांतकडे गेल्याची माहिती मिळाली. प्रशांत हा टिटवाळा रेल्वे स्थानकात असतानाच पीडित मुलीला सोबत घेऊन गेल्याची माहिती मैत्रणीने पीडित मुलीच्या वडिलांना दिली. 


दरम्यान, पीडित मुलगी मित्रांसोबत फिरायला गेली असेल त्यामुळे ती घरी परत येईल अशी आशा घरच्यांना होती. मात्र गेली चार दिवस उलटूनही ती घरी परत आली नसल्याचे पाहून पीडित मुलीच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून 16 नोव्हेंबर रोजी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी प्रशांत सोनवणेवर अपहरण (363 कलम) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. 


यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित 15 वर्षीय मुलीचे अपहरण तिच्याच  मित्राने टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातून केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खोंडे करीत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.


ही बातमी वाचा: