सोलापूर :  दारु पिऊन कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या जन्मदात्या बापाचा मुलानीच (Father Killed by Son) काटा काढला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत छडा लावला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेने माळशिरस तालुक्यात (Malshiras Taluka Solapur) खळबळ उडाली आहे. 


बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर नातेपुते जाणा-या रोडवर भवानी घाट, पिंपरी येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृत व्यक्तीच्या डोक्यावर, तोंडावर जबर मारहाण झाल्याचे दिसून आले होते. या व्यक्तीला जिवे ठार मारून त्यांची मोटार सायकल शिंगणापूर नातेपुते जाणा-या रोडवर भवानी घाट, पिंपरी येथे, घाटाचे तिसरे वळण संपल्यानंतर रोडच्या खाली पाच फूट अंतरावर टाकून खून केला अशी माहिती मिळाली होती. 


या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सोलापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खूणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्टळी भेट देवून माहिती घेतली. त्यावेळी मृत व्यक्ती ही माळशिरस तालुक्यातील मौजे कोंडबावी या गावातील असल्याची माहिती मिळाली. मयताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून माझे वडील पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. तेव्हा मयताचा मुलगा सुरज पांडुरंग सावंत याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर नातेपुते पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम  302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


मयत व्यक्ती ही कोंडबावी गावचा रहिवाशी असल्याने पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना अधिक माहिती मिळाली. यातील मयत हा दारूच्या पूर्णपणे आहारी गेला होता. मागील अनेक वर्षापासून दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ करून त्रास करत होता. त्या त्रासास कंटाळून सदरचा गुन्हा हा त्याचाच मुलगा आणि या प्रकरणातील तक्रारदार सूरज याने केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांच्या तपास पथकाने अंतविधीकार्य पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार आणि संशयित सूरज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. 


पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. पोलीस चौकशीत सूरजकडून विसंगत उत्तरे मिळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वडील हे मागील अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन सारखे सर्वांना शिवीगाळ आणि त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून वडील घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने तोंडावर, डोक्यावर, ठिकठिकाणी मारहाण करून जिवे ठार मारले. सांगून प्रेत एका मोठ्या पिशवीमध्ये भरून प्रेत पिकअप वाहनात टाकून मयताची मोटार सायकल बहिणीने चालवत नेवून नातेपुते येथील शिंगणापूर भवानी घाटात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काठाडात टाकला असल्याची कबुली दिली. 


या कबुलीनंतर मृताचा मुलगा आणि तक्रारदार असलेला आरोपी सूरज सावंत याला नातेपुते पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे हे करीत आहे.