भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शासनाकडून 426 कोटी रुपयांच्या 100 एमएलटी पाणीपुरवठा योजनेला (Watersupply Scheme) मंजूरी देण्यात आलीये. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये या योजनेला मूर्त स्वरुप देण्यात आले. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. तसेच भिवंडी शहरातील ताडाळी येथील हनुमान मंदिर प्रांगणात हा शुभारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार महेश चौघुले, आयुक्त अजय वैद्य,अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे,विठ्ठल ठाके यांच्यासह पालिका अधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिवंडी शहराची ही पाणीपुरवठा योजना मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यासाठी अनेक मागील अनेक वर्षांमध्ये प्रय्तन केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाचे हे भिजत घोंगडं पडलं होतं. ते आता पूर्णत्वास गेलं आहे. यामुळे पुढील तीस वर्षांसाठी भिवंडीचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होईल.
पुढील तीस वर्षांसाठी पाण्याची चिंता मिटणार
ही योजना कार्यान्वित झाल्यास शहराची पुढील तीस वर्षांसाठी पाण्याची चिंता मिटणार आहे. तसेच यामुळे 60 लाख लोकसंख्येची तहान भागवली जाईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये शहराच्या विकासाठी उपलब्ध झालेत. त्यामुळे भिवंडी शहरात झपाट्याने बदल होत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 हजार कोटींच्या कामचा शुभारंभ
केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर, सांगली, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयाच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व मलनिसारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून हे भूमिपूजन पार पडले.
रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महापालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.