मुंबई : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून गोळ्या झाडून एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात गदारोळ उठला, अनेकांनी या एन्काऊंटरचं (Badlapur encounter) स्वागत केलं तर विरोधकांनी एन्काऊंटर नसून ही हत्या असल्याचं म्हटलं होतं. आरोपीला शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे, पण पोलिसांनी कायदा हाती घेतल्याची प्रतिक्रिया देखील त्यावेळी विरोधकांनी दिली होती. आता, याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा अहवाल वाचून दाखवण्यात आला. त्यामध्ये, अक्षय शिंदेला (Akshay shinde) बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालावर आता अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलंय. तसेच, आजही आम्ही भीक मागून जीवन जगत असल्याची व्यथाही त्यांनी मांडली.  


बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचं न्यायालयीन समितीने अहवालात म्हटलं आहे. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानंतर अक्षयच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले. माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता. ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, कोर्टाने आदेश दिल्यानुसार त्यांना सजा भेटेल हेच माझं म्हणणं आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, माझा मुलगा सत्य होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप टाकला होता, आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी त्याला मारून टाकले, अशी भावनिक प्रतिक्रिया अक्षय शिंदेंच्या आईने दिली. 


न्यायालयातील अहवालात निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे, माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, कोर्टाने त्या लोकांना सजा दिली आहे. माझा मुलगा सत्य होता, तर ते सत्यच झालं आहे. आम्हाला कुठेही मिळत काम नाही, आम्ही कल्याणमध्ये आहोत. अजूनही कल्याणमध्ये भीक मागून खात आहोत. कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे अक्षय शिंदेच्या आईने एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 


हेही वाचा


बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया