ठाणे : शवविच्छेदन (Post-mortem) नको म्हणून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह (Dead Body) घेऊन बाप पसार झाल्याची घटना ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिळ डायघर इथून बापाला ताब्यात घेतलं आणि कळवा रुग्णालयात आलं. बाळाचा मृतदेह देखील रुग्णालयात आणला आहे.
गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आठ महिन्यांच्या बाळाला उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे उपचारादरम्यान या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्यावेळी न्युमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचं आढळून आलं होतं. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावं लागेल, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या बापाने विरोध केला. त्यानंतर वॉर्डमधून आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला.
शिळ डायघरमधून बाप ताब्यात
ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर इथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणलं. तसंच बाळाचा मृतदेह देखील रुग्णालयात आणण्यात आलेला आहे.
बाळाचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळाला घेऊन संबंधित इसम रिक्षातून घेऊन निघून गेला. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सुरक्षारक्षकांनी पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून पळ काढण्यात बापाला यश आलं.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
आठ महिन्यांच्या बाळाला काल रात्री साडेदहा वाजता दाखल केलं होतं. त्या न्युमोनिया झाला होता. त्याला प्रायव्हेटमधून दिलेल्या औषधांचा ओव्हरडोस दिला असावा अशी शक्यता आहे. बाळावर उपचार सुरु करण्यात आले. पहाटे सव्वापाच वाजता त्याचा मृत्यू झाला. आठ महिन्याचं बाळ, ओव्हरडोसची पार्श्वभूमी आणि 24 तासांत मृत्यू यामुळे कायदेशीररित्या त्याचं शवविच्छेदन करणं गरजेचं होतं. त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. त्यांचा पंचनामा झालाच होता आणि मृतेदह हलवण्यात येणार होतं. सकाळी रुग्णाच्या कुटुंबियांना शवविच्छेदन करणार असल्याचं सांगितलं. परण शवविच्छेदन नको यावरुन मुलाचा बापाने मृतदेह घेऊन पसार झाला, अशी माहिती डॉ.अनिरुद्ध माळगावकर (वैद्यकीय अधीक्षक, कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे) यांनी दिली. मृतदेह कॅज्युअल्टीमध्ये आला असून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
महिनाभरापूर्वी याच रुग्णालयात एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, एक महिन्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या याच रुग्णालयात एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यातच आठ महिन्यांचा बाळाचा मृत्यू झाला आणि बापाने त्या बाळाचा मृतदेह घेऊन पळ काढल्याची घटना घडली होती.
हेही वाचा