कळवा : ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी निर्देश देत चौकशी समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरांतून टीका करण्यात येत होती. विरोधकांनीही यावरून प्रशासनाकडे उत्तर मागितलं होतं. दरम्यान, आता या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर सत्य समोर येईल.


18 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण?


ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ 10 तासांत 18 जणांनी प्राण गमावले. या रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या डीनचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे या 18 रुग्णांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण हे आता तपासानंतर समोर येणार आहे.


ठाण्याच्या रुग्णालयातील 'त्या' मृत्यूंची चौकशी होणार


ठाणे पालिकेने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ठाणे महानगरपालिकेच्या कार्य क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथील रुग्णालयात शनिवार, दि. 12.08.2023 रात्री 10.30 ते रविवार, दि.13.08.2023 सकाळी 8.30 वाजेपयंत दहा तासाांत 18 रुग्णाांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. त्यामुळे या दु:खद घटनेची योग्य ती चौकशी करुन पुढे अश्या घटनांची पुनरावृती होऊ नये, यासाठी आणि या घटनेच्या अहवालासाठी मुख्यमांत्री एकनाथ शिंदे यांन समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.


हॉस्पिटलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता


ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, याची जबाबदारी कोणी स्वीकारणार की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात का? असा संतप्त सवाल देखील आव्हाडांनी केला आहे.


गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी ठेवा, मुख्यमंत्र्यांना आवाहन


ठाण्यात फक्त रंग-रंगोटी, लायटिंग करण्याचं काम झालं, त्यात 400-500 कोटी रुपये घातले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिनाभरात त्या लाईट्स बंद पडल्या तरी चालतील, त्यांची बिलं काढली की यांचं काम झालं, असंही ते म्हणाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत हे आमचं भाग्य आहे, ठाण्याला एवढं मोठं पद मिळतं आणि प्रतिष्ठेचा माणूस मिळाला आहे, पण हृदयाच थोडं ममत्व, थोडी माया, गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी असायला हवी, असा खोचक उपदेश जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला.