ठाणे : गणेशाच्या आगमनाला काही दिवस राहिले असतानाच 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाणे प्रचंड प्रमाणात राज्यात गाजत आहे. या गाण्याचे मूळ गीतकार असलेल्या वडापाव विक्रेत्याची गाथा समोर आली आहे. विशेष म्हणजे या गीतकाराने पाच वर्षापूर्वी वडे तळता तळता या गाण्याची धून तयार केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी हेच गाणे गायले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मात्र त्या मानाने त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. आज मात्र अचानक हेच गाणे बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे या चिमुकल्याने आपल्या अंदाजात गायल्याने तो प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचला. पण या गाण्याचे गीतकार आणि त्यांच्या गायक मुलाची गाथा कधीच समाजासमोर आली नव्हती.
सध्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळण्यासाठी समाज माध्यमांवर ती प्रकाशित होणे गरजेचे झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशातच सध्या गणपतीच्या मुहूर्तावर 'आमच्या पप्पांनी आणले गणपती' या गाण्याचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी हे गाणे तयार करणारे गीतकर मनोज घोरपडे हे भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायतमधील चरणी पाडा अंजूर फाटा येथे वडापावची गाडी सांभाळतात. त्यांचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली आणि मुलगी शौर्य हे दोघं या गाण्याचे गायक आहेत.
मध्यमवर्गीय घोरपडे कुटुंबीय वडापावच्या गाडीवर व्यवसाय करून उदरनिर्वाह करते. मनोज यांनी आपल्या गीत लेखनाचा लहानपणापासूनच छंद जोपासला आहे. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी 'आमच्या पप्पांनी आणला' हे गाणे लिहिले होते. त्यानंतर हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगलं वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेतला. हे गाणं त्यांच्याकडून 2022 मध्ये गाऊन घेतलं. सुरुवातीला त्यांच्या मुलांच्या याच गाण्याला दोन मिलियन व्हूज मिळाले होते. परंतु काही दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने आपल्या अंदाजात गाणे गाऊन त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर या गाण्याला तब्बल साडेसहा मिलियन व्हूज मिळाले. आपल्या गाण्यांना साईराज केंद्रेमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली याचा आनंद असल्याचं मनोज याने सांगितले.
मागील वर्षी बनविलेल्या या गाण्याला वर्षभरात दोन मिलियन व्हूज मिळाले होते, पण साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर मागील काही दिवसात या गाण्याला पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. ती संख्या तब्बल सहा मिलियन व्हूज वर जाऊन पोहचली. त्यामुळे मनोज यांचा हुरूप नक्कीच वाढला आहे. नवरात्रीत आपल्या चिमुकल्या शौर्याकडून त्यांनी " गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे " हे गाणे गाऊन घेतले. स्वतः कोणतीही गायन कला आत्मसात केली नसताना उडत्या चालीवरील गाणी आपल्या मुलांच्या आवाजात शब्दबद्ध करण्यात आनंद असल्याचे मनोज यांनी सांगितलं.
'गणपती येणार आमच्या घरा, दहा दिवसांची मजा करायला' हे गाणं त्यांनी मुलगा मोहित उर्फ माऊली आणि मुलगी शौर्य तसेच भाचा हृदय बुरुड यांच्या आवाजात गाऊन घेतले आहे. हे नवे गाणे या गणपतीच्या आधी प्रकाशित करणार असून ते गाणे सुद्धा पहिल्या गणपती गाण्यासारखेच सर्वांच्या आवडीचे होऊन धुमाकूळ घालेल असा विश्वास मनोज घोरपडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.