ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 18 जणांनी आयुष्य गमावले. मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील होते.
रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.
रात्री 10.30 ते सकाळी 8.30 पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू
याआधी 10 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे दुर्लक्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्र्यांची ठाणे महानगरपालिका, त्यात असलेली वर्षानुवर्षांची सत्ता आणि त्याच महानगरपालिकेचे हे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल, त्याच रुग्णालयात एकाच रात्री 18 रुग्णांना आपले प्राण गमावावे लागणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
10 ऑगस्ट रोजी एकाचा रात्री पाच रुग्णांचा मृत्यू
तीनच दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार समोर आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला होता. तर एका गरोदर मातेचे मृत्यू झाला होता.
हेही वाचा
Kalwa Hospital:कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेळेत उपचार न मिळल्यानं ५ रुग्णांचा मृत्यू