Satyendra Nath Bose : गुगलने भारतीय गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्र नाथ बोस (Dr. Satyendra Nath Bose) यांना एका कलात्मक डूडलसह (Google Doodle) श्रद्धांजली वाहिली आहे. आजच्या (4 जून) या खास डूडलमध्ये डॉ. बोस एक प्रयोग करताना दाखवले आहेत. 1924मध्ये याच दिवशी, डॉ. बोस यांनी त्यांचे क्वांटम फॉर्म्युलेशन अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पाठवले होते, ज्यांनी याला ‘क्वांटम मेकॅनिक्स’मधील एक महत्त्वपूर्ण शोध म्हणून मान्यता दिली.


सत्येंद्र नाथ बोस हे प्रसिद्ध गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रात दोन प्रकारचे रेणू आहेत. एक आहे बोसॉन आणि दुसरा फर्मिअन्स. यापैकी ‘बोसॉन’चे नाव डॉ. सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.


‘क्वांटम मेकॅनिक्स’मध्ये महत्त्वपूर्ण योगदान


1920च्या दशकात ‘क्वांटम मेकॅनिक्स’मधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते विशेषतः ओळखले जातात. डॉ.सत्येंद्र नाथ यांनी शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यासमवेत 'बोस-आइन्स्टाईन स्टॅटीस्टिक्स' आणि 'बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट' सिद्धांताची निर्मिती केली. डॉ. बोस यांनी एका उपअणु कणाचा शोध लावला होता, ज्याला त्यांच्या सन्मानार्थ 'बोसॉन' असे नाव देण्यात आले होते.


सत्येंद्र नाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी बंगाल राज्यातील कोलकाता येथे झाला. 1909 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांनी पाचवा क्रमांक पटकावला होता. यानंतर त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. येथे सत्येंद्र नाथ बोस यांना जगदीशचंद्र बोस, शारदा प्रसन्न दास आणि प्रफुल्ल चंद्र रे यांसारख्या विद्वानांकडून ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली.


अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पाठवला प्रबंध


सत्येंद्र नाथ बोस यांनी 1915मध्ये अप्लाईड मॅथेमॅटिक्समध्ये एमएससीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून पदवी प्राप्त केली, हा एक विक्रम आहे. यानंतर त्यांची भौतिकशास्त्राचे व्याख्याता म्हणून नियुक्ती केली. नंतर त्यांनी ढाका विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात काम केले. येथेच त्यांनी प्रयोगशाळा विकसित केली आणि अनेक प्रयोग केले. बोस यांनी प्लँकच्या क्वांटम रेडिएशन कायद्याचा वापर न करता एक प्रबंध लिहिला. समान कणांच्या अवस्था मोजण्याचा एक नवीन मार्ग यातून सापडला. त्यांनी हा प्रबंध अल्बर्ट आइनस्टाईन यांना पाठवला. आईन्स्टाईन देखील हे पाहून खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्याचे जर्मन भाषेत भाषांतर करून ते एका जर्मन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवला.


.. असे पडले ‘बोसॉन’ नाव!


‘क्वांटम फिजिक्स’ला नवी दिशा देण्यात सत्येंद्र नाथ बोस यांचे मोठे योगदान होते. आधी, शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की अणू हा सर्वात लहान कण आहे. परंतु, जेव्हा असे आढळून आले की, अणूच्या आत अनेक सूक्ष्म कण आहेत, जे सध्याच्या कोणत्याही नियमांमध्ये नाहीत. त्यानंतर बोस यांनी एक नवा नियम मांडला जो 'बोस-आईन्स्टाईन स्टॅटीस्टिक्स सिद्धांत' म्हणून प्रसिद्ध झाला.


या नियमापासून, शास्त्रज्ञांनी सूक्ष्म कणांवर बरेच संशोधन केले आहे. त्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, अणूच्या आत आढळणारे सूक्ष्म अणू कण हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात, त्यापैकी एकाला डॉ. सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावरून 'बोसॉन' आणि एनरिको फर्मीच्या नावावरून 'फर्मिओन' असे नाव देण्यात आले. भारताच्या या महान शास्त्रज्ञाने 4 फेब्रुवारी 1974 रोजी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा :