नवी दिल्ली: भारताने जगातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप (Liquid-Mirror Telescope) बसवला आहे. उत्तराखंडमधील नैनिताल या ठिकाणच्या देवस्थळ ऑब्जर्व्हेटरीमध्ये एका पर्वतावर हा टेलिस्कोप सेटअप केला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश असून भारताने बेल्जिअम आणि कॅनडाच्या खगोलशास्त्रज्ञांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. या टेलिस्कोपच्या माध्यमातून अंतराळातील सुपरनोव्हा, गुरुत्वीय लेन्स आणि आणि अॅस्टरॉईड यासंबंधीची अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या इंडियन लिक्विड मिरर टेलिस्कोपच्या वतीने अंतराळातील अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. 


काय आहे लिक्विड मिरर टेलिस्कोप?
लिक्विड मिरर टेलिस्कोप ही एक पातळ फिल्मपासून बनलेल्या 4 मीटर व्यासाची रोटेटिंग मिरर आहे. या माध्यमातून प्रकाश किरणांचे एकत्रिकरण करुन त्यावर फोकस केला जातो. या लिक्विड मिरर टेलिस्कोपला समुद्रसपाटीपासून 2450 मीटर उंचीवर बसवण्यात आलं आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच टेलिस्कोप आहे.


 






देवस्थळ ऑब्जर्व्हेटरी या ठिकाणी चार मीटर क्लासच्या दोन टेलिस्कोप आणि देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोपचा सेटअप तयार करण्यात आला आहे. बेल्जिअम, कॅनडा, पोलंडसह आठ देशांच्या मदतीने 2017 साली या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात झाली होती. मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे या कामात अडथला आला. त्यानंतर या कामात पुन्हा एकदा गती येऊन आता हे काम पूर्ण झालं आहे. 


या टेलिस्कोपच्या मदतीने 95 हजार प्रकाशवर्षे दूरची एनसीजी 4274 आकाशगंगा स्पष्टपणे दिसते. तसेच या आकाशगंगेतील ताऱ्यांचेही स्पष्टपणे निरीक्षण करता येऊ शकते.